मुंबई : कडाक्याचे ऊन पडणाऱ्या ऑक्टोबर महिन्यातही पावसाने नाकीनऊ आणले आहेत. मुंबईसह राज्यभरात ठिकठिकाणी पावसाच्या अधिकच्या नोंदी झाल्या असून, १ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत देशभरात ४४ टक्के एवढ्या अधिकच्या पावसाची नोंद झालीआहे. देशात या कालावधीत सरासरी ७६ टक्के एवढा पाऊस पडतो. मात्र या वर्षी पावसाची १०९.७ टक्के नोंद झाली आहे.
महाराष्ट्रात सरासरी ७१.१ टक्के पाऊस पडतो. या वर्षी मात्र १६१.६ टक्के पाऊस पडला असून, तो १२७ टक्के अधिकचा पाऊस आहे.जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, मणिपूर या राज्यांतपावसाची नोंद उणे झाली आहे. पंजाब, उत्तराखंड, आसाम आणि त्रिपुरा राज्यात सर्वसाधारण नोंद झाली आहे.
मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू, नागालँड, मेघालय या राज्यांत अतिरिक्त पावसाची नोंद झाली आहे. तरकर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, गुजरात, राजस्थान या राज्यांत अतिरिक्तहून अधिकचा पाऊस नोंदविण्यात आला आहे, अशी माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून देण्यात आली.