नागपूर - आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचाही समावेश आहे. बुधवारी शिवसेनेच्या खासदारांची वर्षा बंगल्यावर बैठक घेण्यात आली. या बैठकीत खासदारांच्या कामाचा आढावा तसेच मतदारसंघातील परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर शिंदेचे निकटवर्तीय असलेले खासदार कृपाल तुमाने यांनी मोठा दावा केला आहे.
खासदार कृपाल तुमाने म्हणाले की, येणाऱ्या काळात लवकरच ठाकरे गटातील खासदार, आमदार शिवसेनेत प्रवेश केलेले दिसतील. कालसुद्धा बैठकीवेळी एक खासदार उपस्थित होते. ते बैठकीत नव्हते पण बाहेर बसले होते. तेदेखील येतील. जे काही खासदार उरलेत त्यांच्या प्रवेशाचा मुहूर्त काढायचा आहे. खासदार, आमदार, पदाधिकारी सर्वांची इच्छा प्रवेशाची आहे ते लवकरच येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संघटनात्मक बांधणीवर चर्चालोकसभेची निवडणूक १० महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलावली होती. खासदारांच्या समस्या जाणून घेतल्या, संघटनात्मक बांधणीवर चर्चा झाली. सर्वांनी निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करावे. युतीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवणार आहोत. प्रचाराची तयारी कशी करायची यावरही चर्चा झाली आहे असंही खासदार कृपाल तुमाने यांनी सांगितले.