मुंबई - अनाथ, निराधार बालकांना संस्थेतून बाहेर पडल्यानंतर जातीचा दाखला नसल्यामुळे विविध शासकीय लाभांपासून उपेक्षित राहावे लागत होते. त्यामुळे अनाथ मुलांना राज्य शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेता यावा यासाठी शिक्षण व नोकरीमध्ये खुल्या प्रवर्गातून १ टक्का समांतर आरक्षण लागू करण्यात आले आहे. त्याचाच भाग म्हणून राज्यातील अकरावी प्रवेशात अनाथ मुलांना खुल्या प्रवर्गातून एक टक्का आरक्षण देण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाच्या सहसचिव सुवर्णा खरात यांनी मंगळवारी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना दिली.अनाथ मुलांच्या संदर्भात जारी केलेल्या शासन निर्णयानुसार हे प्रवेश होतील, असे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. मुंबईसह राज्यात पुणे व पिंपरी-चिंचवड, नागपूर, अमरावती, नाशिक, औरंगाबाद मुख्यालय व पालिका क्षेत्रात अकरावी आॅनलाइनच्या माध्यमातून प्रवेश घेतले जात आहेत. या प्रवेशाची माहिती देण्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या सहसचिव सुवर्णा खरात यांनी पत्रकार परिषद मंत्रालयात आयोजित केली होती. या वेळी अकरावीच्या प्रवेशात अनाथ मुलांनाही प्रवेश देणार असल्याचे त्यांनी सांगितले. अकरावी प्रवेशात आता खुल्या वर्गासाठी ४८ टक्के आरक्षण आहे. त्यामध्येच एक टक्का अनाथांना सामावून घेण्यात येईल.
अकरावी प्रवेशात अनाथ मुलांना १% समांतर आरक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 6:22 AM