आप्पासाहेब पाटील
सोलापूर : सध्या तिकिट बुकींगपासून ते जेवण मागविण्यापर्यंत सर्वच क्षेत्रात डिजिटल माध्यमांचा वापर वाढला आहे. त्याचबरोबर सायबर गुन्ह्यांमध्येही वाढ होत आहे. या गुन्ह्यांना भौगोलिक मर्यादा नसल्यामुळे हे गुन्हे सोडविण्यात गुंतागुंत वाढत आहे. त्यामुळे अशा गुन्ह्यांचा तपासही अत्याधुनिक डिजिटल साधनाच्या माध्यमातून करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र सायबरने राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये सायबर पोलिस ठाणी तसेच सायबर प्रयोगशाळा सुरू केल्या आहेत. येथील कर्मचाºयांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात आले असून, सर्व प्रयोगशाळात गुन्हे उकलण्यासाठी आवश्यक ते सॉफ्टवेअर व इतर यंत्रणा पुरविली आहे. अशा वाढत्या सायबर गुन्ह्याबाबत सायबरचे पोलीस अधीक्षक बालसिंग राजपूत यांच्याशी ‘लोकमत’ ने साधलेला संवाद.
प्रश्न : सायबर गुन्हा नेमका आहे तरी काय? उत्तर : संगणक, मोबाइल किंवा इंटरनेटसह इलेक्ट्रॉनिक व टेलिकम्युनिकेशन नेटवर्क्सचा गैरवापर करुन एखादी व्यक्ती किंवा समूहाला शारीरिक, मानसिक हानी पोहचविण्यासाठी किंवा त्यांची बदनामी करण्यासाठी गुन्हेगारी उद्देशाने केलेले कृत्य म्हणजे सायबर गुन्हा होय. सध्या मोबाईलच्या वापरामुळे सायबर गुन्ह्यांची व्याप्ती वाढत आहे़ यातच मॅट्रोमिनी व आर्थिक फसवणुकीचे प्रमाण जास्त आहेत़ राज्यात विशेषत: सायबर क्राईमसाठी ४३ पोलीस ठाणे निर्माण केले आहेत.
प्रश्न : इंटरनेट वापराविषयी काय सांगाल ?उत्तर : फेसबुक सारख्या सोशल माध्यमांवर आपला वेळ खर्ची करताना पाहायला मिळत आहे. ज्या प्रकारे इंटरनेटचा वापर वाढत आहे. त्याच प्रमाणात या इंटरनेटच्या माध्यमातून सायबर गुन्हे करणारे हॅकर जगातल्या कुठल्याही ठिकाणाहून अगदी सहज आपले सावज टिपून आर्थिक गुन्हे करत आहेत. फेसबुक सारख्या सोशल माध्यमांवर स्वत:चे फोटो, वैयक्तिक माहिती, ईमेल आणि मोबाईल क्रमांक पोस्ट करणे धोक्याचे आहे. बºयाच प्रकरणात एखाद्या व्यक्तीची बदनामी करण्यासाठी फेसबुक अकाउंटवरील खासगी फोटो मॉर्फ करुन समाज माध्यमांवर व्हायरल केले जात आहेत.
पोलीस सतर्क फेसबुक सारख्या समाज माध्यमांवर लॉटरी आणि आॅनलाईन व्हिडीओ गेमच्या माध्यमातून फेसबुक युजर्सना वेगळ्याच संकेत स्थळांवर लॉग इन करण्यास सांगून संबंधित व्यक्तीचे बँक अकाउंट डिटेल्स, पॅनकार्ड, आधारकार्ड डिटेल्स घेऊन नागरिकांना फसवले जात आहे. हे रोखण्यासाठी सायबर पोलीस अहोरात्र सतर्क आहेत.
सायबर गुन्ह्यांच्या प्रकाराबाबत...उत्तर : सध्या आॅनलाइन ट्रान्झकश्न करण्यासाठी सर्रास मोबाईल अॅप्लीकेशन किंवा आॅनलाइन बॅकींगव्दारे करीत आहोत़ वैयक्तिक स्वरुपातील संवेदनशील माहितीची चोरी किंवा परस्पर देवाण-घेवाण, हॅकिंग (डिनायल आॅफ सर्व्हिस), आर्थिक फसवणूक (फिशिंग, स्पूफिंग), अश्लील मजकूर (पोर्नोग्राफी), कॉपीराइट आणि बौद्धिक संपदा हक्कांचे उल्लंघन हे सर्व गुन्हे सायबर गुन्हे प्रकारात मोडतात.