मुंबई : राज्याच्या वेगवेगळ््या भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे सुमारे एक हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले असावे, असा प्राथमिक अंदाज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. केवळ यवतमाळ जिल्ह्यात १७ हजार हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश दिले असले तरी रब्बी पिकाची अंतिम आणेवारी १५ मार्च २०१५ रोजी येत असल्याने तोपर्यंत थांबवण्याचा निर्णय सरकारने घेतला, तर शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळणार नाही.मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधून अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज घेतला. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले की, अवकाळी पावसामुळे ज्वारी, हरभरा, गहू, आंबा, द्राक्ष आणि डाळींब यांचे नुकसान झाले आहे. राज्यात सर्वाधिक पाऊस यवतमाळ जिल्ह्यात झाला असून १७ हजार हेक्टर जमिनीवरील पिकाची हानी झाली. विदर्भात नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी कापणी करून ठेवलेल्या पिकांचे नुकसान झाले. सांगली परिसरात बेदाण्यांची हानी झाली आहे. कोकणात आंब्याचे नुकसान झाले आहे. आणेवारीपर्यंत थांबायचे की..?गारपिटीच्या संकटाच्यावेळी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे मदतीची मागणी केली होती. ती मदत अद्याप प्राप्त झालेली नाही, याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले असता येत्या आठ ते दहा दिवसांत गारपीटग्रस्तांना केंद्र सरकारने देऊ केलेली मदत प्राप्त होईल, असे सांगितले. गारपीट झाली तेव्हा डिसेंबरमध्ये अंतिम आणेवारी येईपर्यंत थांबावे लागले होते. रब्बी पिकाचे अवकाळी पावसाने नुकसान झाले असून या पिकांची अंतिम आणेवारी १५ मार्च २०१५ रोजी येईल. त्यामुळे त्याकरिता थांबून मग नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला तर प्रत्यक्ष नुकसानीची रक्कम हाती पडण्यास उशिर होईल, अशी चिंता याबाबतच्या बैठकीत व्यक्त करण्यात आली.
पावसामुळे १ हजार कोटींचा फटका
By admin | Published: March 03, 2015 2:55 AM