नागपूर : बनावट कागदपत्रे तयार करून तरुण मुलांची विदेशात तस्करी करणाºया नागपुरातील १० दाम्पत्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने नागपुरात खळबळ उडाली आहे. आरोपींनी ५० मुलांना इंग्लंडला नेऊन सोेडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे, असे सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.२००७ ते २०१७ या दहा वर्षांच्या कालावधीत नागपुरातून विदेशात गेलेली ५० मुले पुन्हा भारतात परतलीच नसल्याचे ब्रिटिश उच्चायुक्तांच्या लक्षात आले. त्यांनी ही बाब भारतीय उच्चायुक्तांना कळविल्यानंतर दिल्लीतून सूत्रे हलली. नागपूर पोलिसांनी केलेल्या चौकशीत बनावट पासपोर्ट आणि व्हिसासाठी बनावट कागदपत्रे तयार करून या मुलांना विदेशात पाठवल्याचे उघडकीस आले.प्रत्येक मुलामागे दोन लाखमुबलक पगाराचे आमिष दाखवून मुलांना इंग्लंडला पाठविणारे १० दाम्पत्याचे एक रॅकेटच नागपुरात कार्यरत असल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. प्रत्येक मुलामागे पालकांकडून दोन लाख रुपये उकळण्यात आले.अशी पाठविली जात होती मुलेप्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे सांगून आपल्या मुलांना इंग्लंडला घेऊन जाणारी १० जोडपी भारतात परत येताना मात्र मुलांना तिथेच सोडून परतत असल्याची बाब ब्रिटिश उच्चायुक्तांच्या लक्षात आली. विशेष म्हणजे, एका दाम्पत्याने तर चक्क १९ मुले विदेशात नेऊन सोडली, तेव्हाच संशयाची पाल चुकचुकली होती.आरोपी दाम्पत्यांची नावे (कंसात त्यांनी विदेशात नेलेली मुले)गुरुमीत आणि राजेंद्रसिंग अटवाल (८ मुले), परमजीत आणि रुल्डासिंग गुजर (१९ मुले), सुरिंदर आणि जर्नलसिंग धोत्रा (६ मुले), जगविंदरसिंग आणि पियरासिंग ( ६ मुले), परमजितसिंग आणि सतवीरसिंग धोत्रा (२ मुले), कुलजीत आणि मनजीतसिंग धोत्रा (३ मुले), सतवंतसिंग निशांतसिंग धोत्रा (३ मुले), मनजीत आणि काश्मीरसिंग धोत्रा (२ मुले), निर्मल आणि अजितसिंग (४ मुले), परविंदर आणि अजितसिंग (४ मुले), जसविंदरसिंग बलबीरसिंग मुलतानी (५ मुले) अशी या १० दाम्पत्याची नावे आहेत.
मानवी तस्करीप्रकरणी १0 दाम्पत्यांवर गुन्हा! विदेशातही जाळे : नागपुरात गुन्ह्याची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 3:29 AM