पुणे, दि. 17- . बोपोडी येथे बुधवारी भरदिवसा रिक्षातून एका महिलेने बाळाच्या आईला धक्का देऊन त्यांची दहा दिवसाची मुलगी पळवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. पण आता त्या 10 दिवसाच्या बाळाचं अपहरण हा बनाव असल्याचं समोर आलं आहे. रेश्मा शेख या महिलेने स्वतः तिच्या 10 दिवसाच्या बाळाला पुलावरून खाली नदीत फेकल्याचं उघड झालं आहे. रेश्मा शेख यांनी फेकलेलं बाळ त्याचं चौथं अपत्य होतं. बाळाला पुलावरून नदीत टाकल्यावर या महिलेने बाळाचं अपहरण झाल्याचा कांगावा केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे.
बाळाचं अपहरण झाल्याची तक्रार केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. तपासा दरम्यान रेश्मा शेख या महिलेने तिच्या कृत्याची कबूली दिली आहे. दरम्यान, पोलिसांकडून या महिलेची कसून चौकशी केली जात असून नदीत टाकलेल्या बाळाच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे. या महिलेने हा प्रकार नेमका का केला? याचा शोधही पोलिसांकडून घेतला जातो आहे.
नेमकं काय घडलं ?बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास रिक्षातून एका महिलेने बाळाच्या आईला धक्का देऊन त्यांची दहा दिवसाची मुलगी पळवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. रेश्मा शेख (वय 20 रा. दापोडी) बोपोडीतील खासगी रूग्णालयातून एका शेअर रिक्षात बसून दापोडीकडे घरी परत येत असताना त्या रिक्षात आगोदर बसलेल्या अनोळखी महिलेने रेश्मा शेखला धक्का मारून रिक्षाबाहेर ढकलून दिले. तिचे दहा दिवसांचे बाळ रिक्षावाल्याच्या मदतीने पळवून नेलं, असं त्या महिलेने सांगितलं होतं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रेश्मा शेख या बोपोडीतील एका खासगी रुग्णालयात रिक्षातून दहा दिवसांच्या मुलीला घेऊन गेल्या. मुलीला रूग्णालयात घेऊन गेल्यानंतर परत येत असताना, शेख शेअर रिक्षामध्ये बसल्या. त्या रिक्षात आगोदरपासूनच एक महिला प्रवास करत होती. त्या रिक्षात बसल्यावर काही अंतर पुढे गेल्यानंतर त्यांना ज्या ठिकाणी उतरायचं होतं ते ठिकाण येताच रिक्षावाल्याला पैसे द्यावयाचे असल्याने त्यांनी आपले बाळ जवळ बसलेल्या महिलेकडे दिलं. त्यानंतर आरोपी महिलेने शेख यांना जोराचा धक्का दिला, शेख रिक्षातून खाली पडल्या. तेवढ्यात रिक्षावाल्याने रिक्षा सुरू केली. बाळाला घेऊन ती महिला रिक्षातून पळून गेली. हॅरिस पुलाखालील रस्त्याने रिक्षा निघून गेली, अशी माहिती समोर आली होती.