ऑनलाइन लोकमतनांदेड, दि. 10 - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपूरी प्रकल्पाच्या १८ दरवाजांपैकी १० दरवाजांचे आयुष्य संपले आहे़ आश्चर्य म्हणजे नवीन दहाही दरवाजे तयार असून ते तीन वर्षांपासून धूळखात पडून आहेत़ सदरील दरवाजे बसविण्यासाठी गोदावरी महामंडळ निधी देत नसल्याने प्रकल्पाच्या सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण झाला आहे़गेल्या वर्षी प्रकल्प तुडुंब भरला होता़ यंदाही समाधानकारक पाऊस झाला तर प्रकल्पातील पाणी साठवून ठेवता येईल इतकी क्षमता दरवाजांमध्ये नाही़ हा विषय तीन वर्षांपासून प्रलंबित आहे़ दुरुस्तीचे काम, प्रशासकीय मान्यतेच्या फेऱ्यात अडकलेले दरवाजे तयार असूनही बसविले जात नाहीत़ अधीक्षक अभियंता बी़एस़ स्वामी यांनी १० मार्च २०१७ रोजी जलसंपदा विभागाच्या मुख्य सचिवांना पत्र पाठविले आहे़ तसेच विष्णुपूरी पंपगृह विभागाच्या कार्यकारी अभियंत्याच्या अहवालाची प्रतही शासनाकडे आहे़ त्यानुसार पूरस्थिती निर्माण झाली तर मोठी दुर्घटना होवू शकते़ प्रकल्पाची सुरक्षितता व जनहितासाठी ४ कोटी ८६ लाखांचा तातडीचा निधी द्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे़ हा संपूर्ण विषय राष्ट्रवादी बहुजन मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष के़एल़सदावर्ते, सचिव एस़ झेड़ चिखलीकर यांनी चव्हाट्यावर आणला आहे़ सदरचे काम येत्या दीड महिन्यांत पूर्ण झाले नाही तर उद्भवणाऱ्या दुर्घटनेबद्दल जनता माफ करणार नाही, असेही सदावर्ते, चिखलीकर यांनी म्हटले आहे़ प्रकल्पाच्या दरवाजांची अवस्था लक्षात घेवून विष्णुपूरी पंपगृह विभागाने अहवाल दिला होता़ त्यानुसार दापोली येथील कार्यशाळेत तयार केलेले नवीन दरवाजे आणण्यात आले़ शिवाय पाच दरवाजांची उर्वरित कामे खाजगी कंत्राटदाराकडून करून घेण्यात आली़ त्याचेही सुमारे तीन कोटींचे देणे आहे़ एकंदर सर्व कामे पूर्ण करण्यासाठी आठ कोटींची आवश्यकता असल्याचे सांगण्यात येते़ परंतु निधीची तरतूद करण्यासाठी तीन वर्षांपासून टोलवाटोलवी सुरू आहे़ (प्रतिनिधी)।सरकारची उदासिनता अक्षम्य - खा.अशोक चव्हाणअत्यंत महत्त्वाच्या व तातडीच्या विषयावरही शासन गंभीर नाही, सरकारची उदासिनता अक्षम्य आहे़, अशी टीका करीत माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़अशोक चव्हाण यांनी विष्णुपूरी प्रकल्पाचे दरवाजे बसविण्यासाठी तातडीने निधी पुरवावा, अशी भूमिका मांडली आहे़ लोकमतशी बोलताना ते म्हणाले, मराठवाड्यातील प्रकल्पांबाबत शासन दुजाभाव करीत आहे़ नवीन दहा दरवाजे तीन वर्षांपासून तयार आहेत़ ते बसविण्यासाठी निधी देण्याची तयारी शासन व महामंडळाची नसेल तर हा जनतेच्या आयुष्याशी खेळ आहे़ विष्णुपूरी प्रकल्पाद्वारे लाखो लोकांना पेयजलाचा पुरवठा होतो, हे तरी ध्यानात ठेवा, असा टोलाही खा़चव्हाण यांनी लगावला़
विष्णुपूरीच्या १० दरवाजांचे आयुष्य संपले
By admin | Published: April 10, 2017 8:14 PM