मुंबई : मुंबईत डिसेंबर २००२ ते मार्च २००३ दरम्यान झालेल्या तिहेरी बॉम्बस्फोटांप्रकरणी विशेष प्रीव्हेन्शन आॅफ टेररिझम अॅक्ट (पोटा) न्यायालयाने १० जणांना दोषी ठरवले. या बॉम्बस्फोटांत १२ जण ठार तर १३९ लोक जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटांप्रकरणी तिघांची सुटका करताना न्या. पी. आर. देशमुख यांनी १० जणांची शिक्षा बुधवारी जाहीर करण्यात येईल, असे स्पष्ट केले.बहिष्कृत असलेल्या ‘सिमी’चा महासचिव साकीब नाचन, अतिफ नाझीर मुल्ला, हसीब झुबैर मुल्ला, गुलाम अकबर खोतल, मोहम्मद कामिलशेख, फरहान मलिक खोत, नूर महम्मद अन्सारी, डॉ. वाहीद अब्दुल अन्सारी, अन्वर अली जावेद खान आणि मुझम्मिल अख्तर अब्दुल अन्सारी यांना विशेष पोटा न्यायालयाने तिहेरी बॉम्बस्फोटांप्रकरणी दोषी ठरवले आहे. तर नदीम पोलाबा, हरुन रशीद लोहार आणि अदनान मुल्ला यांची सर्व आरोपांतून सुटका केली आहे. (प्रतिनिधी) हत्या, देशाविरुद्ध युद्ध छेडले...तिन्ही बॉम्बस्फोटांचा एकच कट रचण्यात आल्याने या तिन्ही बॉम्बस्फोटांचा खटला एकत्रित चालवण्यात आला. सर्व आरोपींना हत्या, हत्येचा प्रयत्न करणे, कट रचणे, देशाविरुद्ध युद्ध छेडणे व अन्य आयपीसी कलमांखाली तसेच आर्म्स अॅक्ट, रेल्वे अॅक्ट, एक्सप्लोसिव्ह सबस्टान्स अॅक्ट आणि पोटाअंतर्गत दोषी ठरवण्यात आले आहे. या सर्वांना कोणती शिक्षा द्यायची यावर बुधवारी सरकारी वकील रोहिणी सॅलियन व बचावपक्षाच्या वकिलांमध्ये युक्तिवाद होईल. सूड उगवण्यासाठी बॉम्बस्फोट ६ डिसेंबर २००२ रोजी मुंबई सेंट्रल टर्मिनसमध्ये असलेल्या मॅकडोनल्ड रेस्टॉरंटमध्ये बॉम्बस्फोट झाला. दुसरा बॉम्बस्फोट २७ जानेवारी २००३ रोजी विलेपार्ले येथील भाजीबाजारात झाला. तर तिसरा बॉम्बस्फोट सीएसटी- कर्जत या लोकलमधील महिला डब्यात मुलुंड स्टेशनला झाला. सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, या सर्व आरोपींनी बाबरी मशीद पाडल्याचा व गुजरात दंगलीचा बदला म्हणून हे बॉम्बस्फोट केले.साकीब नाचन सूत्रधारस्फोटाचा सूत्रधार साकीब नाचन व लष्कर- ए- तोयबाचा पाकिस्तानी सदस्य फैझल खान यांनी २३ जणांसह हे बॉम्बस्फोट घडवले. या केसमधील पाच जणांचा खटल्यादरम्यानच मृत्यू झाला. तर पाच जण अद्याप फरारी आहेत. बॉम्बस्फोटासाठी मनुष्यबळ, दारुगोळा पुरवण्याचे काम नाचनने केल्याचा आरोप आहे.
१० दोषी तर तिघे सुटले
By admin | Published: March 30, 2016 3:20 AM