लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर ठाणे महापालिकेने अखेर यासंदर्भात पोलीस, रेल्वे, वन विभाग यांच्यासह संयुक्त बैठक घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचा आराखडा तयार केला आहे. त्यानुसार, आता फुटपाथ आणि डीपी रोडवरील १०९ धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. सार्वजनिक जागेवरील धार्मिक स्थळे नियमानुकूल करणे, निष्कासित करणे आणि स्थलांतरित करणे, याबाबतची बैठक आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सहा महिन्यांपूर्वी पार पडली होती. परंतु, त्यानंतर या धार्मिक स्थळांबाबत कारवाई करण्याबाबत कोणत्याच हालचाली न झाल्याने अखेर पुन्हा गुरुवारी महापालिका, पोलीस, रेल्वे आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांची एक संयुक्त बैठक झाली.या बैठकीत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याबाबत आराखडा तयार केल्याची माहिती अतिक्रमण विभागाने दिली. दरम्यान, अ वर्गामध्ये ज्या एकूण ५८७ धार्मिक स्थळांचा समावेश आहे, त्याबाबत संबंधित परिमंडळाचे उपआयुक्त, सहायक आयुक्त आणि शहर विकास विभागाचे अधिकारी यांनी संबंधित धर्मस्थळे डीसीआरप्रमाणे नियमानुकूल होतील अथवा नाही, याबाबत कार्यवाहीसाठी प्रक्रिया सुरू आहे. परंतु, ब वर्गात मोडणाऱ्या १२७ धार्मिक स्थळांवर अखेर कारवाई करण्याचे निश्चित झाले आहे. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी याच १२७ धार्मिक स्थळांच्या कारवाईबाबत पालिकेने सबुरीचा निर्णय घेतला होता. >कारवाईचा कृती आराखडा तयारएक वर्षाचा कालावधी लोटून नेण्याचे ठरवून महापालिका निवडणुकीनंतर कारवाई करण्याचे निश्चित केले होते. आता या कारवाईबाबत कृती आराखडा तयार झाला आहे. परंतु, यातील १८ धार्मिक स्थळे ही १९६० पूर्वीची असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. परंतु, उर्वरित १०९ धार्मिक स्थळांवर संयुक्त कारवाई केली जाणार असल्याचे पालिकेने सांगितले. याच मुद्द्यावर सहा महिन्यांपूर्वी बैठक झाली होती. मात्र, त्यानंतर याबाबत काहीच कारवाई झाली नाही. आजच्या बैठकीत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याबाबत आराखडा तयार केल्याची माहिती अतिक्रमण विभागाने दिली.
१०९ धार्मिक स्थळांवर अखेर पडणार हातोडा
By admin | Published: July 14, 2017 3:48 AM