मुंबई : पोटदुखीचा त्रास होत असलेल्या एका ४७ वर्षीय महिलेच्या पोटातून तब्बल १० किलो वजनाचा फायब्रॉइड गोळा काढण्याची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया नुकतीच मुंबईतील कामा रुग्णालयात झाली. गेल्या तीन महिन्यांपासून तिला पोटदुखीचा त्रास सुरू होता. गॅसेसमुळे हा त्रास होत असेल, असे निदान डॉक्टरांनी करून औषधोपचार केले. मात्र तरीही त्रास थांबला नाही. डॉक्टरांनी सांगितलेल्या रक्त तपासण्यांतूनही काहीच निष्पन्न झाले नव्हते. त्यातच तिच्या पोटाचा आकारही वाढला होता. पोटदुखी न थांबल्याने या महिलेने कामा रुग्णालय गाठले. तेथे सोनोग्राफी, एमआरआय या चाचण्या केल्यानंतर पोटात गाठ असल्याचे दिसून आले. अधिक तपासण्यांनंतर फायब्रॉइडचा गोळा पोटात पसरल्याचे निदान झाले. गर्भाशयाला चिकटून हा गोळा वाढला होता. गोळा वाढल्याने त्याचा दबाव मूत्रपिंडावर आला होता. आतड्यांवरही परिणाम झाला होता. हा गोळा काढण्यासाठी अडीच तासांची शस्त्रक्रिया करण्यात आली. गोळा मोठा असल्याने कर्करोगाचा धोका अधिक वाटत होता. पण, कर्करोगाची लागण झाली नसल्याची माहिती कामा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजश्री कटके यांनी दिली. या महिलेची प्रकृती आता स्थिर आहे. (प्रतिनिधी)
महिलेच्या पोटातून १० किलोचा गोळा काढला
By admin | Published: October 24, 2016 3:21 AM