मुंबई : राज्यात गुटखा बंदी असतानाही ठाणे जिल्ह्यातून गेल्या ९ दिवसांमध्ये १० लाखांचा गुटखा अन्न व औषध प्रशासनाने जप्त केला आहे. गुटखा बंदी लागू असली तरीही छुप्या मार्गाने राज्यात गुटखा आणून विक्री केली जाते. याला आळा घालण्यासाठी एफडीए सक्रिय झाले आहे. जुलै महिन्याच्या ९ दिवसांमध्ये ठाणे जिल्ह्यात ५० ठिकाणी छापे टाकण्यात आले. यापैकी १० ठिकाणी गुटखा सापडला. १० लाख रुपये किंमतीचा गुटखा एफडीएने जप्त केला असून साठवणूक, विक्री करणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आल्याचे एफडीएचे सहआयुक्त (अन्न) सुरेश देशमुख यांनी दिली. जून महिन्यातही ठाणे जिल्ह्यात ३८४ ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. यापैकी १७ ठिकाणी गुटखा सापडला होता. या छाप्यांमधून ८ लाख रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला होता. गुटखा हा आरोग्यास हानिकारक आहे. गुटखा सेवनामुळे कर्करोग होण्याचा धोका वाढतो. यामुळेच राज्यात २०१३ मध्ये गुटखा बंदी घालण्यात आली आहे. राज्यात गुटखा साठवणूक आणि विक्रीवर बंदी आहे. तरीही अनेक ठिकाणी छुप्या मार्गाने गुटखा आयात केला जातो. सण - उत्सवाच्या काळात गुटखा जास्त प्रमाणात आणला जातो. हे टाळण्यासाठी एफडीए कारवाई करत आहे. (प्रतिनिधी)
नऊ दिवसांत १० लाखांचा गुटखा जप्त
By admin | Published: July 12, 2015 2:45 AM