राम देशपांडे/ अकोला : रेल्वेस्थानक परिसरात आणि रेल्वे रुळांवर प्रवाशांनी फेकलेल्या अन्नपदार्थांचा फडशा पाडण्यासाठी उंदरांनी आपला मोर्चा रेल्वेकडे वळविला आहे. ही डोकेदुखी दूर करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने आठ महिन्यांपूर्वी एका खासगी कंपनीला प्रवासी गाड्यांमधील उंदरं पकडण्याचे कंत्राट दिले. या कालावधीत कंत्राटदार कंपनीने प्रवासी गाड्यांमध्ये राबविलेल्या सर्च मोहीमेतून १२00 उंदरं हाती लागली. या मोहिमेपोटी रेल्वेला १0 लाख रूपयांचा भूर्दंंड सोसावा लागला. रेल्वेस्थानक आणि परिसरात, तसेच रेल्वे रुळांवर प्रवाशांकडून टाकले जाणारे अन्नपदार्थ खाणार्या उंदीर व घुशींनी रेल्वे प्रशासनाच्या नाकी नऊ आणले आहेत. बीळ करण्यासाठी रेल्वेस्थानकाचा परिसर पोखरला जात असल्याने, सांडपाणी वाहून नेणार्या नाल्या तुंबत असून, स्थानकांचा पाया पोकळ होत असल्याचेही प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. प्रवाशांचे साहित्य कुरतडणे, त्यांनी सोबत आणलेल्या खाद्यपदार्थांंवर डल्ला मारणे, अशा अनेक तक्रारी रेल्वेला मोठय़ा प्रमाणात प्राप्त झाल्या होत्या. गाड्यांमधील सीट कव्हर, वातानुकूलित डब्यांमधील बेडरोल, लाइट-पंख्यांच्या वायरी आदी कुरतडण्याचे प्रकारही वाढले आहेत. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई मार्गावर धावणार्या प्रवासी गाड्यांमध्ये उंदरांचा सर्वाधिक धुडगूस होता. यावर उपाय म्हणून आठ महिन्यांपूर्वी रेल्वे प्रशासनाने एका खासगी कंपनीला प्रमुख मार्गांंवर धावणार्या प्रवासी गाड्यांमधील उंदीर पकडण्याचे कंत्राट दिले. त्यानंतर रेल्वेने कंत्राटदाराच्या कामाचा आढावा घेतला असता, कंत्राटदार कंपनीने १0 लाख रुपये खर्च करून दिल्ली, मुंबई, कोलकाता व चेन्नई मार्गावर धावणार्या १२ प्रवासी गाड्यांमधील ९६ डब्यांमध्ये 'रॅट कॅचर' लावून १ हजार २१४ उंदरांना पकडले असल्याचे स्पष्ट झाले. या उपदव्यापावर प्रभावी उपाययोजना करण्यास कंत्राटदार कंपनीदेखील असर्मथ ठरत असून, त्यामुळे कंत्राट सुरू ठेवायचे की बंद करायचे, हा प्रश्न सध्या रेल्वे प्रशासनासमोर उभा ठाकला आहे. रेल्वे गाड्यांमध्ये उंदीर मारण्याचे औषध टाकण्याचा पर्यायही रेल्वे प्रशासनासमोर होता; मात्र प्रवासी गाड्यांमध्ये असा प्रयोग करणे घातक ठरू शकले असते, असे भुसावळ मंडळ अधिकार्यांनी यासंदर्भात माहिती देताना स्पष्ट केले.
१२00 उंदरं पकडण्यासाठी रेल्वेला १0 लाखाचा भूर्दंड!
By admin | Published: September 09, 2015 1:48 AM