ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. २९ - पतीकडून १० लाख रुपये मिळवण्यासाठी मीरा रोड येथे रहाणा-या महिलेने स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सदर महिला रविवारी दुपारी एकच्या सुमारास कोचिंग क्लासला जाण्यासाठी घरातून बाहेर पडली. दोघे पती-पत्नी कोचिंग क्लास चालवतात.
काही तासांनी पतीला पत्नीच्या फोननंबरवरुन व्हॉटस अॅपवर तिच्या अपहरणाचा संदेश आला. या मेसेजमध्ये पत्नीच्या सुटकेसाठी १० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती. पत्नी बेशुध्दा अवस्थेत निपचित पडल्याचा एक फोटोही पाठवण्यात आला होता. पतीने त्यानंतर पोलिस ठाणे गाठले आणि पत्नीच्या अपहरणाची तक्रार नोंदवली.
पोलिसांनी महिलेला शोधण्यासाठी सहा टीम्स बनवल्या. फोनवरुन या महिलेचे शेवटचे लोकेशन मीरारोड असल्याचे समजले. पोलिसांनी रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यात ही महिला एकटी चालत असल्याचे दिसले. सोमवारी संध्याकाळी ही महिला पोलिसांना सापडली.
चर्चगेट येथे जाणारी ट्रेन पकडत असताना पोलिसांनी या महिलेला रोखले व ताब्यात घेतले. पती आणि मी दोघे मिळून कोचिंग क्लास चालवतो पण पतीकडून मला हवे तसे पैसे मिळत नाहीत म्हणून आपण हे सर्व केल्याचे या महिलेने पोलिसांना सांगितले. क्राईम सिरीयल बघून मी माझ्या अपहरणाचा डाव रचला असे तिने सांगितले.