मुंबई : केरळ येथील पुरग्रस्तांना मदतीसाठी एसटीचे कर्मचारी तसेच महामंडळ पुढे सरसावले आहे. पुरग्रस्तांना मदतीसाठी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या उपस्थितीत एसटी कर्मचारी तसेच महामंडळाच्या वतीने १० कोटी रुपयांच्या मदतीचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपुर्द केला.रावते यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी मंत्रालयात एसटीच्या मान्यताप्राप्त तसेच इतर कामगार संघटनांसमवेत बैठक झाली. त्यात केरळ येथील पुरग्रस्तांना कामगारांमार्फत मदत करण्याबाबत चर्चा झाली. सर्व कामगार संघटनांनी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन पूरग्रस्तांना मदतीसाठी देण्याची तयारी दर्शविली. मात्र, कर्मचाºयांच्या वेतनातून फक्त अर्ध्या दिवसाचे वेतन देण्यात यावे आणि त्यात तेवढीच रक्कम एसटी प्रशासनामार्फत देण्यात यावी, अशी सूचना रावते यांनी केली. त्यानुसार मदतीचा १०कोटी रुपयांचा धनादेश आज मुख्यमंत्र्यांकडे सुपुर्द करण्यात आला. यावेळी रावते यांच्यासह महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल, एसटी कर्मचारी रामदास पवार, योगेश मुसळे, नितीन गदमळे, आप्पा वरपे, कमलाकर साळवे, संदीप कातकर यांच्यासह विविध कामगार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
एसटी महामंडळाकडून केरळसाठी १० कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 2:16 AM