मुंबई : लोकसभा निवडणुकीत राज्यातील २९ मंत्र्यांपैकी १० मंत्र्यांच्या विधानसभा मतदारसंघांमध्ये २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदान घटले. १९ मंत्र्यांच्या मतदारसंघांमधील मतदानाचा टक्का मात्र वाढला. ज्यांच्या विधानसभा मतदारसंघांमध्ये कमी मतदान झाले त्यांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचाही समावेश आहे.
ज्या मंत्र्यांच्या विधानसभा मतदारसंघात मतदान वाढले त्यात रवींद्र चव्हाण हे टॉपवर आहेत. अब्दुल सत्तार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, छगन भुजबळ, डॉ. विजयकुमार गावित हे टॉप फाइव्हमध्ये आहेत. मतदानाचा टक्का घसरलेल्या मंत्र्यांमध्ये दिलीप वळसे-पाटील, मंगलप्रभात लोढा, राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत, अतुल सावे यांचा पहिल्या पाचांत समावेश आहे. नंदुरबारमध्ये डाॅ. विजयकुमार गावित यांच्या कन्या डॉ. हीना या भाजपच्या उमेदवार आहेत. विखे पाटील यांचे पुत्र डाॅ. सुजय हे अहमदनगरमधून लढत आहेत; पण विखे यांचा मतदारसंघ शिर्डी लोकसभा मतदारसंघात येतो.
कुणाच्या मतदारसंघात किती वाढला मतांचा टक्का?धनंजय मुंडे यांनी त्यांच्या भगिनी पंकजा यांच्यासाठी मेहनत घेतली. त्यांच्या परळी या विधानसभा मतदारसंघात ४.२८ टक्के इतके मतदान वाढले. सुधीर मुनगंटीवार स्वत: चंद्रपूरमधून भाजपचे उमेदवार होते. त्यांचा बल्लारपूर हा विधानसभा मतदारसंघही याच चंद्रपूरमध्येच येतो. बल्लारपुरात ४.२६ टक्के मतदान वाढले.
छगन भुजबळांच्या येवल्यात ४.४ टक्के मतटक्का वाढला, हा मतदारसंघ दिंडोरी लोकसभेत येतो, तिथे भाजपच्या डॉ. भारती पवार विरुद्ध शरद पवार गटाचे भास्कर भगरे असा सामना आहे. भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांचा डोंबिवली मतदारसंघ हा कल्याण लोकसभेला जोडलेला आहे. तिथे सर्वांत जास्त म्हणजे ९.५६ टक्के मतदान वाढले. कल्याणमध्ये मुख्यमंत्र्यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे महायुतीचे उमेदवार आहेत.