नवी दिल्ली : महिनाभरापासून रखडलेल्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा अखेर मुहूर्त ठरला असून सोमवारी, ३० डिसेंबर रोजी शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे जवळपास 36 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
या पार्श्वभूमीवर राज्यातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिल्लीत काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि के.सी. वेणुगोपाल यांची भेट घेतली. या भेटीनंतर बाळासाहेब थोरात यांनी उद्या शपथविधी होणार असून काँग्रेसच्या मंत्र्यांची अंतिम यादी तयार करण्यात आल्याचे सांगितले. तसेच, ही यादी आज जाहीर करण्यात येणार असून काँग्रेसचे 12 मंत्री असणार आहेत, त्यापैकी 10 कॅबिनेट मंत्री असतील, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार उद्या 30 डिसेंबरला पार पडणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर तयारीही जोरदार सुरु आहे. मात्र उद्या मंत्रिमंडळ विस्तारात कोण मंत्रिपदाची शपथ घेणार याची उत्सुकता सर्वांना आहे. याआधी 28 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, छगन भुजबळ, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत या सहा कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यानंतर हिवाळी अधिवेशनापूर्वी तात्पुरते खाते वाटप करण्यात आले. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार कधी, याविषयी उत्सुकता होती.
मंत्रिमंडळातील संभाव्य चेहरेशिवसेना : रविंद्र वायकर, गुलाबराव पाटील, संजय राठोड, तानाजी सावंत, अनिल परब, सुनील राऊत, बच्चू कडू, संजय शिरसाठ, प्रकाश आबिटकर, डॉ. संजय रायमुलकर, श्रीनिवास वनगा, उदय सामंत किंवा भास्कर जाधव, अनिल बाबर किंवा शंभूराज देसाई, नीलम गोºहे
राष्ट्रवादी : अजित पवार, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, नवाब मलिक, अनिल देशमुख, राजेंद्र शिंगणे, जितेंद्र आव्हाड, मकरंद पाटील, दिलीप बनकर, अनिल भाईदास पाटील, धर्मराव बाबा आत्राम, आदिती तटकरे, भरत भालके, रोहित पवार, दत्ता भरणे, संजयमामा शिंदे (विधानसभा उपाध्यक्ष: भारत भालके किंवा राजेश टोपे )
काँग्रेस : अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, के. सी. पाडवी, संग्राम थोपटे, अमित देशमुख, यशोमती ठाकूर, सतेज पाटील, विश्वजीत कदम किंवा प्रणिती शिंदे, असलम शेख किंवा अमीन पटेल. (सुनील केदार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्याविषयी अनिश्चितता)