आॅनलाइन लोकमत सोलापूरपंढरपूर दि ३ : राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीत दाखल झाले असताना मुख्यमंत्र्यांसह एकूण १० मंत्री देखील पंढरीत येत आहेत. आषाढी सोहळ्यानिमित्त शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक होणार आहे़ तसेच विविध पक्षाच्या नेतेमंडळींनाही विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागली असून ते पंढरीत दाखल होणार आहेत़परंपरेप्रमाणे आषाढी एकादशीची महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा विठ्ठलाच्या महापूजेसाठी सपत्नीक येत आहेत. त्यांच्याबरोबर स्वच्छता व पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, सहकारमंत्री सुभाष देशमुख, जलसंधारण मंत्री राम शिंदे, पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, जलसंपदा, जलसंधारण व संसदीय कार्य राज्यमंत्री विजय शिवतारे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख हे मंत्री तसेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, माजी मंत्री एकनाथ खडसे, माजी मंत्री बबनराव पाचपुते हेही विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत आहेत. गेली अनेक वर्षे विठ्ठलाच्या दर्शनासाठी नियमितपणे येणारे मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आ. उल्हासराव पवार, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे हे कॉँग्रेसचे नेतेमंडळी आषाढी यात्रेसाठी पंढरीत येत आहेत.गेल्या अनेक दिवसांपासून कॉँग्रेस पक्षाची सत्ता असताना मुख्यमंत्री कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी विचारविनिमय करत होते. कॉँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष कल्याणराव काळे यांनी ही परंपरा तत्कालीन मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख यांच्यापासून सुरू केली होती. विरोधी पक्षात असतानाही पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून जिल्ह्यातील विविध प्रश्न समजून घेण्याची प्रथा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सुरू ठेवली आहे. त्यानुसार कल्याणराव काळे यांच्या पंढरपूर येथील निवासस्थानी या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे कल्याणराव काळे यांनी सांगितले.शिवसेनेचे जलसंपदामंत्री विजय शिवतारे, खा. रवींद्र गायकवाड, खा. बंडू जाधव हे नेतेमंडळीही आषाढीसाठी पंढरीत येणार असल्याचे शिवसेना तालुकाप्रमुख संभाजी शिंदे यांनी सांगितले. एकीकडे भाविकांच्या सुविधेसाठी व्यस्त असणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेला नेतेमंडळींच्या व्हीआयपी वारीसाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.
मुख्यमंत्र्यांसह १० मंत्री आज पंढरीत, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार विठ्ठलाची पहाटे शासकीय पूजा,
By admin | Published: July 03, 2017 10:48 AM