सुजल पाटील
सोलापूर : मध्य रेल्वेच्या पाच विभागातील ४७७ रेल्वे स्थानकांवरून धावणाºया मेल, एक्स्प्रेस व पॅसेंजर गाड्यांमध्ये एप्रिल २०१९ ते जानेवारी २०२० पर्यंत विनातिकीट प्रवास करणाºया ३२ लाख ७१ हजार प्रवाशांवर कारवाई करून त्यांच्याकडून १६८ कोटी नऊ लाखांचा दंड वसूल करण्यात आला़ मागील वर्षी याच काळात १४७ कोटी रुपयांचा दंड वसूल केला होता़ मागील वर्षीच्या तुलनेत यंदा १४़३५ टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.
मध्य रेल्वे विभागाने महाराष्ट्र, ईशान्य कर्नाटक आणि दक्षिण मध्य प्रदेशाच्या काही भागात रेल्वेचे जाळे निर्माण केले आहे़ ज्यामध्ये मुंबई, पुणे, भुसावळ, नागपूर आणि सोलापूर या पाच विभागांचा समावेश असून, या पाच विभागांत ४७७ रेल्वे स्थानक आहेत़ मध्य रेल्वे या पाच विभागांतून मेल, एक्स्प्रेस, पॅसेंजर गाड्यांच्या माध्यमातून देशातील प्रत्येक कानाकोपºयातील दररोज ३० लाखांहून अधिक प्रवासी रेल्वेने प्रवास करतात.
मुंबई उपनगरातून १५७३ उपनगरी गाड्या तर पुणे विभागातील पुणे-लोणावळा विभागात ४० उपनगरी सेवा चालवल्या जातात. मागील काही दिवसांपासून प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वेच्या उत्पन्नात भरच पडत आहे़ मात्र वाढत्या गर्दीचा फायदा घेऊन फुकट प्रवास करणाºयांची संख्याही दिवसेंदिवस वाढतच असल्याचे समोर आले़ त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने प्रत्येक विभागातील अधिकाºयांचे विविध पथक तयार करून विनातिकीट प्रवास करणारे प्रवासी, अनियमित प्रवासी व प्रमाणापेक्षा जास्त सामान घेऊन जाणारे प्रवासी, अस्वच्छता पसरविणारे प्रवासी व धूम्रपान करणारे अशांवर कारवाई सुरू केली़ ज्यातून मागील दहा महिन्यांत १६८ कोटी नऊ लाखांचा दंड जमा झाला.
रेल्वेतून विनातिकीट प्रवास करीत असल्याच्या बाबी अनेक वेळा समोर आल्या होत्या़ विनातिकीट प्रवास करून रेल्वे प्रशासनाचे नुकसान करणाºया प्रवाशांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरून प्राप्त झाले होते़ त्यानुसार मध्य रेल्वे विभागातील सर्वच रेल्वे स्थानकावर तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली आहे़ तिकीट न काढणाºया प्रवाशांसह इतर गैरकृत्य करणाºया प्रवाशांवर तत्काळ दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.
मध्य रेल्वेच्या कारवाईचा धावता आढावा...मध्य रेल्वेने जानेवारी २०१९ या कालावधीतील ११़४४ कोटी रुपयांच्या तुलनेत जानेवारी २०२० या कालावधीत १२.९५ कोटी रुपयांची कमाई केली असून, अशाप्रकारे १३.२० टक्क्यांची वाढ झाली आहे. जानेवारी २०१९ मध्ये बुक न केलेल्या सामानासह विनातिकीट, अनियमित प्रवासाची २.५१ लाख प्रकरणे आढळली तर जानेवारी २०२० मध्ये २.८२ लाख प्रकरणे आढळली. अशाप्रकारे १२.३५ टक्के वाढ झाली आहे. एप्रिल २०१९ ते जानेवारी २०२० या कालावधीत विनातिकीट, अनियमित प्रवास आणि विनाबुक सामानाची एकूण ३२.७१ लाख प्रकरणे आढळून आली आहेत, तर मागील वर्षी याच काळात २९.५६ लाख प्रकरणे आढळली होती. अशाप्रकारे या आर्थिक वर्षात १०.६५ टक्के वाढ झाली आहे. एप्रिल २०१९ ते जानेवारी २०२० या कालावधीत विनातिकीट, अनियमित प्रवास आणि विनाबुक सामानाच्या प्रकरणातून १६८.०९ कोटी रुपये वसूल केले तर मागील वर्षी याच काळात १४७ कोटी रुपये वसूल केले होते, अशाप्रकारे या आर्थिक वर्षात १४.३५ टक्के वाढ झाली आहे. जानेवारी २०२० या कालावधीत आरक्षित प्रवासाच्या तिकिटांच्या हस्तांतरणाची २४७ प्रकरणे आढळून आली आणि दंड स्वरूपात १.९९ लाख रुपये वसूल करण्यात आले.
मध्य रेल्वे प्रवाशांसाठी उत्तम सेवा पुरविण्याचा प्रयत्न करीत आहे़ तसेच विनातिकीट प्रवासावर आळा घालण्यासाठी नियमितपणे विनातिकीट आणि अनियमित प्रवाशांविरोधात तीव्र मोहीम राबविली जात आहे. विनातिकीट प्रवासामुळे होणारा महसुलातील तोटा आणि अशा इतर अनियमिततेचे वरिष्ठ अधिकारी बारकाईने निरीक्षण करीत आहेत. त्यामुळे प्रवाशांनी असुविधा टाळण्यासाठी आणि सन्मानाने प्रवास करण्यासाठी योग्य आणि वैध रेल्वे तिकिटांसह प्रवास करावा.- प्रदीप हिरडे,वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक, सोलापूर मंडल