अकोला - Prakash Ambedkar on Mahavikas Aghadi ( Marathi News ) बिहार किंवा उत्तर प्रदेशला मी प्रचाराला गेलो नाही, तरी तिथले १० टक्के मतदान इथे बसून फिरवू शकतो. मला तिथे जाण्याची सुद्धा गरज नाही असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
अकोला इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आम्ही स्वतंत्र निवडणूक लढलो, तर या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि भाजपा यांच्यातच सामना होईल. अद्याप महाविकास आघाडीच्या मुंबई येथील बैठकीचे कोणतेही निमंत्रण नाही.पण शरद पवारांनी ६ तारखेला चर्चेसाठी बोलावले आहे अशी माहिती त्यांनी दिली.
तसेच धर्मनिरपेक्ष मतदारांना आश्वासित करण्यासाठी आणि काही घटक पक्षांचा इतिहास लक्षात घेता जे घटक पक्ष आहेत, त्यांनी या धर्मनिरपेक्ष मतदाराला आम्ही भाजपासोबत यापुढे युती करणार नाही असं सांगावे आणि घटक पक्षांना शक्य असेल, तर याचा लेखी मसुदा युतीच्या वेळी जाहीर करण्याचे आवाहनही त्यांनी महाविकास आघाडीला केले आहे.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीसोबत अजूनपर्यंत युती पूर्ण झालेली नाही तेव्हा इतर पक्षांकडून पक्ष बैठक किंवा कार्यक्रमाला बोलावत असतील तर त्या बैठकी, कार्यक्रमामध्ये उपस्थित राहू नये. प्रकाश आंबेडकर व पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांची सूचना येईपर्यंत कोणीही सहभागी होऊ नये असं आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना करण्यात आलेले आहे.
काँग्रेस-शिवसेनेत १५; शिवसेना-राष्ट्रवादीत ९ जागांवर वाद! महाविकास आघाडीतील जागावाटपात काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात १५ जागांमध्ये वाद आहे. तर, शिवसेना (ठाकरे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष यांच्यात ९ जागांवर वाद असल्याचे सांगत, घटक पक्षांनी जागा वाटपासंदर्भात समन्वय तातडीने साधावा, असेही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.