मी शेतकऱ्याचं पोरगं, ग्रामीण भागात राहिलोय. भाषा माझी तशीच आहे. मी कुणाला घाबरत नाही. जेलला टाका नाहीतर कुठेही टाका..माघारी परतल्यावर पुन्हा आरक्षणासाठी लढेन. संधी हातातून गेलेली नाही. सरकारच्या अंगात मोठेपण हवेत. सगेसोयरेची अंमलबजावणी करा हेच मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील असं विधान मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. आज त्यांनी पुन्हा माध्यमांशी संवाद साधला.
मला अटक करू द्या, ज्या जेलमध्ये असेन, ज्या रस्त्याने जाईल तेव्हा कोट्यवधी लोक रस्त्यावर दिसतील. मी दोषी नाही. मी समाजासाठी लढतोय. उभं आयुष्य पणाला लावलंय. ५७ लाख नोंदींच्या माध्यमातून दीड कोटी लोकांना आरक्षण मिळालं असेल. उर्वरित मराठा समाजासाठी आरक्षण मागतोय, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. कुठलीही यंत्रणा वापरा, काहीही झालं तरी मी हटत नाही. सत्ता असल्याने ते कधीही अटक करू शकतात. आम्हाला कायदे कळत नाही का...संचारबंदी कधी लावावी लागते हे कळते. रात्रीच्या कारवाया सुरू आहेत, अशी टीकाही मनोज जरांगे पाटलांनी केली.
मी सगेसोयरे पासून हटणार नाही. ओबीसी आरक्षणात जायचे असेल तर २७ टक्के जात मागास असावी लागते. ओबीसीमध्ये आरक्षण द्यायचे तर ती मागास असावी लागते आणि ते सिद्ध झाले आहे. मराठा समाज आता मागास सिद्ध झाला आहे. मी १० टक्के मराठा आरक्षण मान्य करायला तयार आहे. पण ते ओबीसीमध्ये द्या, अशी मागणी मनोज जरांगे पाटलांनी केली आहे. मी १० टक्के स्वीकारावे म्हणून तुम्ही माझ्या मागे चौकश्या लावल्या आहेत. आमच्या मुलांना केंद्रात सवलती मिळाल्या पाहिजे. माझा जीवात जीव असेपर्यंत मराठा समाजाशी गद्दारी करणार नाही. सगेसोयरेची अंबलबजवणी करा, नाराजीची लाट अंगावर घेऊ नका, असं आवाहन देखील मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला केलं आहे.
फडणवीस त्यांचा डाव १०० टक्के यशस्वी करतील
मी गद्दार नाही. पाठीत खंजीर खुपसत नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझे शत्रू नाहीत. सगेसोयरे याची अंमलबजावणी करावी. ते त्या पदावर नसते तर आम्ही त्यांना कशाला बोललो असतो? अख्ख्या राज्यातून मराठा समाजाची फसवणूक कुणी कुणी केली त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार आहोत. सामुहिक कट रचून आमची फसवणूक केली असे गुन्हे आम्ही सरकारवर दाखल करू असंही जरांगेंनी म्हटलं आहे. फडणवीस त्यांचा डाव १०० टक्के यशस्वी करतील. त्यात ते माहीर आहेत. माझ्याविरोधात अहवाल तयार होत आलाय. मला गुंतवायचे सुरू आहे. मराठा आमदार, खासदार फडफड करायला लागलेत. नेत्याच्या बाजूने बोलतायेत असं म्हणत जरांगेंनी विरोधात बोलणाऱ्या नेत्यांवर टीका केली.