- मनोज गडनीस, मुंबई राज्याच्या अर्थसंकल्पाद्वारे मूल्यवर्धित करामध्ये (व्हॅट) अर्धा टक्का वाढ करण्याच्या घोषणेचा मोठा बोजा ग्राहकांच्या खिशावर पडणार असून यामुळे किमान १० टक्क्यांनी भाववाढ होईल, असा अंदाज अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. सध्या शून्य टक्के, ५ टक्के, १२.५ टक्के आणि २५ ते ३० टक्के अशा वस्तूच्या व मालाच्या घटकानुसार चार टप्प्यांत व्हॅटची आकारणी होते. यामधील ५ टक्क्यांच्या टप्प्यांत अर्धा टक्का वाढ करत ही टक्केवारी साडेपाच टक्के इतकी झाली आहे. पाच टक्के आकारणीमध्ये कोणत्या वस्तूंचा समावेश आहे याची यादी व्हॅट नियमावलीच्या शेड्युल सीमध्ये उपलब्ध आहे. यावर नजर टाकल्यास बहुतांश सर्व वस्तूंवरील कच्चा माल, औषध, कृषी संसाधने, कापूस, अॅल्युमिनियम कन्डक्टर, कॉपी राइट करणे, विविध प्रकारचे परवाने, बांधकामासाठी लागणाऱ्या विटा, विमान इंधन, बांबू, विडी, सायकली, विविध प्रकारचे धातू यांचा समावेश आहे. यामध्ये अर्धा टक्का होणारी वाढ विचारात घेता प्रत्यक्ष बाजारात येणाऱ्या वस्तूची अंतिम किंमत किमान १० टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज चार्टर्ड अकाउंटंट उमेश शर्मा यांनी व्यक्त केला. आगामी आर्थिक वर्षात कराच्या माध्यमातून ३६३ कोटी रुपयांच्या वाढीव संकलनाचे उद्दिष्ट राज्य सरकारने डोळ्यासमोर ठेवले आहे. यापैकी किमान ३५० कोटी रुपये हे व्हॅटमध्ये झालेल्या अर्धा टक्का वाढीद्वारे सरकारच्या तिजोरीत जमा होतील. शेतीची साधने महागणार । राज्याचा अर्थसंकल्प हा केंद्र सरकारच्या धर्तीवर शेतिप्रधान असल्याचा उल्लेख करत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणाची सुरुवात केली असली तरी बारकाईने पाहिल्यास शेतीची साधने महागणार आहेत. याचे कारण म्हणजे, शेड्युल सीमध्ये अर्थात आता साडेपाच टक्के होऊ घातलेल्या व्हॅटमध्ये शेतीच्या विविध साधनांचा समावेश आहे.
खिशाला १० टक्के कात्री !
By admin | Published: March 19, 2016 3:26 AM