मुंबई : विधानसभेतून विधान परिषदेवर १० सदस्य निवडून देण्यासाठी १० जून रोजी होत असलेल्या निवडणुकीत या वेळी कमालीची चुरस असेल. भाजपाला आपले उमेदवार ठरविताना सर्वाधिक डोकेदुखीचा सामना करावा लागू शकतो. भाजपाच्या शोभाताई फडणवीस आणि मित्रपक्ष शिवसंग्रामचे विनायक मेटे हे दोन सदस्य निवृत्त होत आहेत. मात्र या वेळी पक्षाकडे १२३ विधानसभा सदस्य असल्याने त्यांचे चार उमेदवार निवडून येऊ शकतात. मेटे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांना भाजपाने परिषदेवर पाठविले तर उर्वरित दोन जागांसाठी इच्छुकांची भाजपामध्ये प्रचंड गर्दी आहे. शिवसेनेचे दिवाकर रावते, सुभाष देसाई हे दोन कॅबिनेट मंत्री निवृत्त होत आहेत. त्यांना पुन्हा संधी दिली जाईल, हे स्पष्ट आहे. शिवसेनेचे संख्याबळ ६३ आहे आणि त्यांचे दोन्ही उमेदवार आरामात निवडून येतील. एक उमेदवार जिंकण्यासाठी २९चा कोटा लागतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे निंबाळकर (विधान परिषद सभापती), धनंजय मुंडे (विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते) आणि प्रकाश बिनसाळे हे तीन जण निवृत्त होत आहेत. राष्ट्रवादीचे संख्याबळ ४१ आहे. त्यामुळे दुसरा उमेदवार निवडून आणताना त्यांची दमछाक होईल. हीच परिस्थिती काँग्रेसची आहे. मुजफ्फर हुसेन आणि दीप्ती चवधरी निवृत्त होत आहेत. अपक्ष आमदार विजय सावंत यांचीही जागा रिक्त होत आहे. काँग्रेसचे संख्याबळ ४२ आहे आणि दुसरा उमेदवार निवडून देताना त्यांनाही कसरत करावी लागणार आहे. अपक्ष, शेकाप, मनसे, समाजवादी पार्टी, बहुजन विकास आघाडी हे छोटे पक्ष काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे असेल. काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्रितपणे लढणार असल्याने थोडी ओढाताण करून दोघांत मिळून तीन जागा निवडून येऊ शकतात. चवथ्या जागेसाठी एखादा तगडा उमेदवार देण्याचा विचारही होऊ शकतो. भाजपाने पाचवी जागा लढविण्याची चाचपणी सुरू केली आहे. अपक्ष, लहान पक्षांनी एकत्रित येऊन दबावगट तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या परिस्थितीत या निवडणुकीमध्ये घोडेबाजाराला ऊत येऊ शकतो. (विशेष प्रतिनिधी)
विधान परिषदेच्या १० जागांसाठी चुरस
By admin | Published: May 13, 2016 3:49 AM