मुंबई : कागदोपत्री मान्यतेच्या जोरावर एस.टी. कामगार संघटना गैरफायदा घेत असेल, तर परिवहनमंत्र्यांनी इतर संघटनांसोबत चर्चा करावी, अशी एकमुखी मागणी कृती समितीने सोमवारी परिवहनमंत्र्यांना केली आहे. शिवाय दिवाळी सणाचा विचार करून एसटी कर्मचा-यांना १० हजार रुपये सानुग्रह अनुदान आणि वाढीव महागाई भत्ता घोषित करण्याचे आवाहन महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष व खासदार अरविंद सावंत यांनी केले आहे.सावंत यांनी सांगितले की, निवडणूक कार्यपद्धती किंवा गुप्त मतदान प्रक्रियेद्वारे एसटी कामगार संघटनेस मान्यता मिळालेली नाही. हे लक्षात घेऊन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी त्यांच्या धमक्यांना घाबरू नये. कामगारांची दिशाभूल करून सातव्या वेतन आयोगासारखी अवास्तव मागणी मान्यताप्राप्त संघटनेकडून सुरू आहे. त्यामुळेच गेल्या १८ महिन्यांपासून कामगार वेतन कराराच्या फायद्यापासून वंचित राहिला आहे. परिणामी, कामगार सेनेसोबत चर्चा करून रावते यांनी वेतन करार करावा. एसटीची कोणतीही सेवा विस्कळीत होऊ देणार नाही, असे वचन कामगार सेनेतर्फे त्यांनी दिले आहे.ऐन दिवाळीत संप पुकारून प्रवासी जनतेची गैरसोय करण्याचे काम मान्यताप्राप्त संघटनेकडून सुरू असल्याचे कृती समितीचे नेते हिरेन रेडकर यांनी सांगितले. रेडकर म्हणाले की, महामंडळ, परिवहनमंत्री आणि मुख्यमंत्री अशा टप्प्यांवर चर्चा केल्यानंतरच संपाचे हत्यार उपसण्याची गरज होती. परिवहनमंत्री आणि मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केल्यानंतरही मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर स्वत: कृती समिती कामगारांसाठी मान्यताप्राप्त संघटनेच्या पाठीशी उभी राहिली असती. कामगारांच्या वेतन कराराचे भांडवल सुरू आहे. त्यामुळे कामगारांचे नुकसान होत असून कृती समिती परिवहनमंत्र्यांसोबत वेतन करारासंदर्भात चर्चेसाठी तयार आहे.
एसटी कर्मचा-यांना हवा १० हजार रुपये बोनस! परिवहनमंत्र्यांना साकडे : वेतन करार करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 3:39 AM