औरंगाबाद, दि. 29:राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जुलै महिन्यात घेतलेल्या दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल आज मंगळवारी आॅनलाइन जाहीर करण्यात आला. औरंगाबाद विभागीय मंडळाचा निकाल २७.०७ टक्के एवढा लागला असून पाच जिल्ह्यातील १३ हजार १७२ विद्यार्थ्यांपैकी जवळपास १० हजार विद्यार्थी या परीक्षेत नापास झाले आहेत.
यासंदर्भात विभागीय मंडळाच्या नवनियुक्त सचिव एस. एस. पुन्ने यांनी सांगितले की, यंदा १८ जुलै ते २ आॅगस्ट दरम्यान दहावीची फेरपरीक्षा घेण्यात आली. विभागीय मंडळांतर्गत औरंगाबाद, बीड, परभणी, जालना आणि हिंगोली या पाच जिल्ह्यातील १३ हजार १७२ विद्यार्थी परीक्षेला प्रवीष्ठ झाले होते. यापैकी ३ हजार ५६६ विद्यार्थी उत्तिर्ण झाले. अनुत्तिर्ण विद्यार्थ्यांची संख्या लक्षनीय आहे. दहावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून शिक्षणमंत्री विनोद तावडेंच्या संकल्पनेतून या विद्यार्थ्यांची जुलैमध्येच फेरपरीक्षा घेण्यात आली होती. या फेरपरीक्षेचा निकाल मागील वर्षाच्या तुलनेत ४.९२ अर्थात जवळपास ५ टक्क्यांनी घटला आहे. याही परीक्षेत मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तिर्णतेचे प्रमाण ६.१७ टक्क्यांनी अधिक आहे.
राज्यातील नऊ विभागीय मंडळांमध्ये औरंगाबाद मंडळ या निकालात चौथ्या क्रमांकावर फेकले गेले आहे. राज्यात नागपूर विभागीय मंडळाचा निकाल ३१.१० टक्के लागला असून त्याने अव्वल स्थान पटकावले आहे. दुसºया क्रमांकावर नाशिक (२९.४६ टक्के), तिसºया क्रमांकावर अमरावती (२८.२५ टक्के) विभागीय मंडळ स्थिरावले आहे. सन २०१५ पासून जुलैमध्येच फेर परीक्षा घेण्याची पद्धत सुरू झाली. त्यावर्षी औरंगाबाद विभागीय मंडळांचा निकाल २७.६५ टक्के आणि गेल्या वर्षी ३१.१९ टक्के निकाल लागला होता. गत वर्षाच्या तुलनेत निकालात मोठी घसरण झालेली आहे. या परीक्षेत उत्तिर्ण विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावीमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने राबविलेल्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातूनच या विद्यार्थ्यांचा विचार केला जाणार आहे.
गुणपत्रिकाबाबत बोर्डाने साधली चुप्पीदहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल तर लागला; पण या परीक्षेच्या गुणपत्रिका कधी वाटप करणार, अशी विचारणा केली असता बोर्डाच्या विभागीय सचिव एस. एस. पुन्ने यांनी सांगितले की, गुणपत्रिकेबाबत राज्य मंडळाकडून आम्हाला कोणत्याही सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे गुणपत्रिका विद्यार्थ्यांना कधी मिळणार, याबद्दल तूर्तास तरी आम्ही सांगू शकत नसल्याचे पुन्ने म्हणाल्या. तथापि, या परीक्षेत औरंगाबाद जिल्ह्यातील १ हजार १९६ विद्यार्थी, बीड- ५८२, परभणी- ५१८, जालना- ६०५ आणि हिंगोली जिल्ह्यातील ६६५ विद्यार्थी उत्तिर्ण झाले आहेत.