सिंधुदुर्ग : सूड उगविण्याच्या हेतूने धारदार शस्त्राचा धाक दाखवून एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणातील आरोपी आकाश पुंडलिक राऊत (२१, रा. वेंगुर्ला-गावडेवाडी) याला येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विभा वि. विरकर यांनी 10 वर्षे सश्रम कारावास व नऊ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात पीडित मुलीची साक्ष महत्त्वाची ठरली.याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, पीडित मुलगी ही आकाशच्या प्रेयसीची मैत्रीण होती. आकाश व त्याची प्रेयसी यांच्यात काही कारणाने वाद झाल्याने दोघेही एकमेकांशी बोलत नव्हते. पीडित मुलीने आपल्या प्रेयसीला आपल्याबद्दल चुकीची माहिती दिल्याचा समज आकाश याने करून घेत डोक्यात राग भरला होता.२० आॅक्टोबर २०१६ रोजी पीडित मुलगी शिकवणीला जात असताना वेंगुर्ले येथील एका हॉटेलसमोर दुचाकी थांबवून आकाशने तिला थांबवले. तिला घरी असलेल्या आपल्या मावशीला प्रेयसीसोबतच्या प्रेम प्रकरणाची माहिती देण्यासाठी घरी येण्याची विनंती केली. त्यानुसार ती त्याच्या घरी गेली. मात्र त्यावेळी आकाशच्या घरी कोणीच नव्हते. प्रेयसीला दूर केल्याच्या घटनेचा बदला घेणार असल्याचे सांगत आकाश याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही घटना कोणास सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली.दरम्यान, या प्रकरणी आरोपी आकाश याच्यावर वेंगुर्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या खटल्याची सुनावणी प्रमुख न्यायाधीश विभा विरकर यांच्यासमोर झाली. यावेळी सहा साक्षीदार तपासण्यात आले. तपासी अंमलदार म्हणून वेंगुर्ले पोलीस ठाण्याच्या तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक आर. डी. गोरड यांनी काम पाहिले. समोर आलेल्या साक्षी पुराव्यांनुसार न्यायालयाने आकाश याला दोषी ठरविले. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता सूर्यकांत खानोलकर यांनी काम पाहिले.दंडाची रक्कम पीडित मुलीला देण्याचे आदेश१० वर्षे सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ३ महिने जादा कारावास, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८ नुसार ३ वर्षे सश्रम कारावास, तीन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ३ महिने जादा कारावास, तसेच अन्य एका गुन्ह्यात १ वर्ष सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिना जादा कारावास अशी शिक्षा सुनावली. विविध तीन कलमांतर्गत ठोठावण्यात आलेली शिक्षा एकत्रित भोगण्यास मुभा देण्यात आली असून दंडाची रक्कम पीडित मुलीला देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.वर्षभरातच शिक्षा मिळाल्याने समाधान : खानोलकरया शिक्षेनंतर सरकारी अभियोक्ता सूर्यकांत खानोलकर यांनी या निकालावर समाधान व्यक्त केले. आजकाल काही तरूण इंटरनेटच्या माध्यमातून अनेक पॉर्न साईट्स बघत असतात. त्यामुळे असे प्रकार वाढीस लागलेले दिसतात. मात्र, घटना घडल्यापासून केवळ एका वर्षात झालेली ही शिक्षा पाहता अशा प्रकारांना वचक बसेल.
अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी तरुणाला 10 वर्षांचा सश्रम कारावास
By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2017 7:24 PM