राजगुरुनगर : बल्लाळवाडी (ता. जुन्नर) येथे भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या मित्रावर चाकूने खुनी हल्ला करणाऱ्या २६ वर्षीय युवकाला राजगुरुनगर येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. जगताप यांनी १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.ही घटना १६ आॅक्टोबर २०१३ रोजी घडली होती. विजय जयवंत डोंगरे (रा. बल्लाळवाडी, ता. जुन्नर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव असून प्रवीण विलास गावडे (वय २५, रा. बल्लाळवाडी) हा आरोपीच्या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाला होता. आरोपी विजय, प्रवीण व आकाश तांबोळी हे तिघेजण मित्र होते. आरोपी व आकाश यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून भांडण झाले आणि दोघांमध्ये मारामारी झाली. प्रवीण याने हे भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याचा धक्का लागून आरोपी विजय हा खाली पडला. दोघेही भांडण थांबवत नाही म्हणून प्रवीण घरी निघून गेला आणि घरी कॉटवर झोपला. साडेचार वाजता आरोपी विजय हा हातात सुरा घेऊन प्रवीणच्या घरात शिरला व हातातील सुऱ्याने प्रवीणच्या मानेवर, पोटावर व हातावर वार केले. या हल्ल्यामध्ये प्रवीण गंभीर जखमी झाला. या संदर्भात प्रवीणचे चुलते अशोक मनोहर गावडे यांनी विजयच्या विरोधामध्ये ओतूर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली. तत्कालीन सहायक पोलीस निरिक्षक जे. एच. कदम व पोलीस हवालदार अभिमन्यू कवडे यांनी विजयवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली. न्या. जगताप यांच्यासमोर हा खटला उभा राहिल्यानंतर फियार्दी, जखमी युवक, पंच आणि डॉक्टरांची साक्ष महत्त्वाची ठरली. (वार्ताहर)>न्या. जगताप यांनी आरोपी विजय यास दोषी धरून भांदवि कलम ३०७ नुसार खुनाचा प्रयत्न केल्यामुळे दहा वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने अधिक शिक्षा व भांदवि कलम ४५२ नुसार अनाधिकाराने घरात प्रवेश केल्यावरून पाच वर्षे सक्तमजुरी व ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना अधिकची शिक्षा सुनावली. या दोन्हीही शिक्षा एकाच वेळी भोगायच्या आहेत. सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील न्या. गिरीश कोबल यांनी बाजू मांडली.
खुनाच्या प्रयत्नासाठी १० वर्षे सक्तमजुरी
By admin | Published: March 01, 2017 12:52 AM