नागपूर : शिकार केल्याप्रकरणी दोषी आढळून येणाऱ्या आरोपीस होणारी शिक्षा वाढवून ती १० वर्ष आणि आर्थिक दंड ५ लाख रुपये करण्यात यावा, अशी शिफारस राज्य शासनाने केंद्र सरकारला केली आहे, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी सोमवारी विधानसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली. वर्षा गायकवाड यांनी चंद्रपूर जिल्ह्यात मृत आढळून आलेल्या दोन वाघांचा मुद्दा उपस्थित करीत वन्यप्राण्यांच्या शिकारीवर चिंता व्यक्त केली होती. मुनगंटीवार यांनी यावर उत्तर देताना स्पष्ट केले की, एका वाघाचा मृत्यू वाहनाच्या धडकेने झाला. राज्यात शिकारींच्या घटना कमी झाल्याचा दावाही त्यांनी केला. वाघांची संख्या वाढून १९० झाली आहे. सन २०१३ मध्ये ७ वाघांची शिकार झाली. २०१४ मध्ये केवळ एकाच वाघाची शिकार झाली. २०१३ मध्ये ५, २०१४-४, आणि २०१५ मध्ये ६ वाघांचा मृत्यू हा नैसर्गिक झाला आहे. राज्यात स्थापन करण्यात आलेल्या टायगर फोर्समुळे शिकारीवर नियंत्रण ठेवता आले आहे. मुनगंटीवार यांनी सांगितले की, एका वाघासाठी १० वर्ग किलोमीटरचे वन क्षेत्राची गरज असते. त्यामुळे वन क्षेत्र वाढविण्याचा विचार होत आहे. केंद्राने व्याघ्र प्रकल्पाबाबत महाराष्ट्रात होत असलेल्या उपाययोजनांची प्रशंसा केली आहे. मेळघाट, पेंच आणि ताडोबाला केंद्राने अतिउत्तम असे म्हटले आहे.जयप्रकाश मुंदडा यांच्या प्रश्नावर मुनगंटीवार यांनी सांगितले की, वाघाच्या मृत्यूनंतर वन विभागातर्फे त्याचे पोस्टमार्टम करणे बंधनकारक आहे. त्यामुळे वाघाचे वय आणि मृत्यू कसा झाला याची माहिती मिळते. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी वाघांच्या शिकारीत आंतरराष्ट्रीय टोळी सक्रिय असल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले की, शिकार रोखण्यासाठी ग्रामीण नागरिकांमध्ये जनजागृती वाढविण्यावर भर दिला जात आहे. अधिकाऱ्यांना शस्त्रे आणि वायरलेसने सज्ज करण्यात आले आहे. गुप्त माहिती देणारी यंत्रणाही मजबूत करण्यात येत आहे. याशिवाय ज्या ज्या काही चांगल्या सूचना असतील त्या केल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)वाघ वाढले की वाघिण शिकारीच्या प्रश्नावर सभागृहातील वातावरण तापले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी प्रश्न उपस्थित करून वातावरणाला हलके केले. अमिताभ बच्चन हे टायगर अॅम्बेसडर बनल्यापासून वाघांची संख्या वाढली की वाघिणींची असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावर वनमंत्री मुनगंटीवार यांनी सुद्धा ‘नहले पे दहला’ मारत याची माहिती शोधण्यासाठी भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती स्थापन करण्याचा शासनाचा विचार आहे. दरम्यान भुजबळ यांनी शिवसेनेला लक्ष्य करीत राज्यात सध्या वाघांचे गुरगुरणे वाढले आहे. मुख्यमंत्री त्यांचे संवर्धन आणि संरक्षणासाठी काय उपाययोजना करीत आहेत, असा प्रश्न उपस्थित केला.
शिकार केल्यास १० वर्षांची शिक्षा
By admin | Published: December 15, 2015 4:00 AM