लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा (अमरावती) : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे वेळोवेळी लैंगिक शोषण करणाऱ्या पोलीस शिपायाला दहा वर्षे कारावास व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा अचलपूर येथील सत्र न्यायालयाने सुनावली. राहुल जानराव खडे असे या प्रकरणातील पोलीस शिपायाचे नाव असून हा निर्णय तदर्थ सत्र न्यायाधीश एम.एस.शेख यांनी सुनावला. राहुलने नात्यातील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष देऊन तिच्याशी शारीरिक संबंध स्थापित केले. त्यानंतर त्याने दुसऱ्या मुलीसोबत लग्नाचा घाट घातला. यामुळे पीडितेने २३ नोव्हेंबर २०१३ रोजी येवदा पोलिसांत तक्रार दिली होती. यावरून त्याच्यावर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. याप्रकरणात सरकारी वकील भोला चव्हाण यांनी ८ साक्षीदार तपासले. याप्रकरणात केलेला युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीस शिक्षा सुनावली.
बलात्कारी पोलिसाला दहा वर्षे कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2017 1:52 AM