- मनोज ताजनेगडचिरोली : अविकसित आणि नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील गावांचा बारमाही संपर्क ठेवण्यात असलेली नदी व नाल्यांची अडचण दूर करण्यासाठी १०० बेली ब्रिज (लोखंडी ढाच्याचे पूल) तयार केले जाणार आहेत. त्यापैकी ७ पुलांना सरकारने पहिल्या टप्प्यात मंजुरी दिली.गडचिरोली जिल्ह्यात आजही अनेक गावांमध्ये जाण्यासाठी नावेने नदी-नाले ओलांडावे लागतात. पावसाळ्यात तर शेकडो गावांचा संपर्क अनेक दिवसांपर्यंत तुटतो. अशा स्थितीत त्या गावांना आरोग्यासह अनेक प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागते. मार्गातील नदी-नाल्यांवर पूल तयार करण्याचा प्रयत्न बांधकाम विभागाने अनेक वेळा केला, पण नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील भाग असल्यामुळे कंत्राटदार हे काम घेण्यास धजावत नाहीत. कोणी हिंमत केलीच तर त्यांचे साहित्य जाळण्यापासून जिवे मारण्यापर्यंतच्या घटना घडल्या आहेत. यावर उपाय म्हणून अत्यंत कमी कालावधीत तयार होणारे बेली ब्रिज तयार करण्यास शासनाने मंजुरी दिली. अहेरी, एटापल्ली, भामरागड आणि चामोर्शी तालुक्यातील ७ पुलांना पहिल्या टप्प्यात मंजुरी मिळाली आहे. पावसाळ्यापूर्वी सर्व पूल उभे राहतील, असे नियोजन आहे.असे असतात बेली ब्रिजसंपूर्ण लोखंडी साहित्यापासून तयार होणाऱ्या या पुलाचा रेडिमेड लोखंडी ढाचा तयार करून नंतर तो नदी-नाल्यावर आणून बसविला जातो. याचा खर्च सिमेंट काँक्रिटच्या पुलापेक्षा जास्त असतो.
नक्षलग्रस्त भागात १०० ‘बेली ब्रिज’
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 5:09 AM