Maharashtra Budget 2022 : भारतरत्न लता दिनानाथ मंगेशकर संगीत विद्यालयासाठी १०० कोटींचा निधी, अजित पवारांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 03:07 PM2022-03-11T15:07:56+5:302022-03-11T15:08:36+5:30
Maharashtra Budget 2022 : या अर्थसंकल्पात गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या नावाने संगीत विद्यालय स्थापन करण्यासाठी १०० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
मुंबई : कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास आणि उद्योग या मुद्द्यावर आधारित २०२२-२३ चा अर्थसंकल्प आज महाविकास आघाडी सरकारने विधानसभेत सादर केला. यासाठी येत्या तीन वर्षांकरिता चार लाख कोटींची तरतूद करण्यात आली. यातून राज्यात भरीव गुंतवणूक होऊन राज्याचा जीडीपी एक लाख कोटी डॉलर्सपर्यंत वाढेल, असे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले. दरम्यान, या अर्थसंकल्पात गानसम्राज्ञी भारतरत्न लता दिनानाथ मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या नावाने संगीत विद्यालय स्थापन करण्यासाठी १०० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Budget Session) सुरू आहे. शुक्रवारी अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत २०२२-२३ चा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी अजित पवार यांनी स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या नावाने संगीत स्मारक स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा केली. मुंबईत कलिनी विद्यापीठाच्या परिसरात लता दिनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय आणि संग्रहालय उभारण्यात येणार आहे. त्यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली. तसेच थोर समाजसुधारकांच्या नावाने विद्यापीठात अध्यासने सुरू करण्याचे धोरण सरकारने आधीच सुरू केले आहे. त्यासाठी तीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, लता मंगेशकर यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे स्मारक व्हावे अशी मागणी होत होती. भाजपचे आमदार राम कदम यांनी शिवाजी पार्कात मंगेशकर यांचे स्मारक व्हावे अशी मागणी केली होती. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लता दीदींचे स्मारक राज्य सरकार आणि केंद्र सरकार करतीलच, त्याची मागणी करण्याची गरज नाही असे म्हटले होते. तर बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शिवाजी पार्काचे स्मशानभूमी करू नका अशी प्रतिक्रिया दिली होती. आता राज्य सरकारने यावर निर्णय घेतला असून लता दीदींच्या नावाने एक आंतरराष्ट्रीय संगीत विद्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या विद्यालयासाठी १०० कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे.
६ फेब्रुवारी रोजी लता मंगेशकर यांचे ९२ व्या वर्षा निधन झाले. त्यांना आधी कोरोनाची लागण झाली होती, तर नंतर न्युमोनियाची लागण झाली. ब्रीच कँडी या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजून १२ मिनिटांनी मल्टिपल ऑर्गन फेल्युअरने त्यांचे निधन झाले. मुंबईच्या शिवाजी पार्कात त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. यावेळी त्यांचे बंधू पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी त्यांना मुखाग्नी दिला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, शाहरुख खान, रणबीर कपूर, जावेद अख्तरसह अनेक नामवंत व्यक्ती उपस्थित होते.