मुंबई - फडणवीस सरकारच्या काळात पुरवणी मागण्यांचे प्रमाण वाढले अशी ओरड काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून करण्यात येत होती. मात्र आता सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीकडून देखील पुरवणी मागण्याचे वाढलेले प्रमाण कायम ठेवण्यात आले आहे. पुरवणी मागण्यांतही बारामतीला झुकते माप मिळाले आहे.
उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपल्या बारामती मतदार संघासाठी 100 कोटीपेक्षा जास्त रकमेची कामे पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून मंजूर करून घेतल्या आहेत. यामध्ये बारामतीत सर्प-पक्ष अभयारण्यासाठी पाच कोटी, एसटी आगारासाठी 8 कोटी, पोलिसांच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी 15 कोटी, जलतरण तलाव आणि क्रीडा साहित्यासाठी 1 कोटी 62 लाख, भूमिगत विद्युतवाहिणीसाठी 50 कोटी, शासकीय वसतिगृहासाठी 12 कोटी आणि वैद्यकीय महाविद्यालयासाठी 9 कोटी 80 लाख मंजूर करण्यात आले आहेत.
यावरून भाजपने महाविकास आघाडीवर टीका केली आहे. राज्यात इतर शहरे असताना केवळ बारामतीवर अधिक प्रेम का, असा सवाल माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान शेतकरी कर्जमाफीसाठीच्या 15 हजार कोटींसह एकूण 24 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सोमवारी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर करण्यात आल्या आहेत. यामध्ये आदित्य ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी 100 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.