ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ४ - पहिल्या भागापासून चर्चेत असलेल्या झी मराठी मनोरंजन वाहिनीवरील 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेने यशस्वीरित्या शंभरभाग पूर्ण केल्याचे सेलिब्रेशन करण्यात आले. या मालिकेने लोकांच्या मनात घर केले असले तरी, प्रत्येक अघटित घटनेला असत्य ठरवणा-या निलिमावहिनी प्रश्नांची उत्तरे कधी सोडवणार अशा प्रश्न प्रेक्षक विचारत आहेत.
या मालिकेत कोकणातील नाईक कुटुंबाची कथा दाखवण्यात आली आहे. या कुटुंबाभोवती एक गूढ असून, काही अदृश्य शक्तींमुळे या कुटुंबाभोवती अघटित घटनांची मालिका सुरु आहे. अभिराम, माधव, निलिमा, सरीता, दत्ता ही पात्रे आज लोकप्रिय झाली आहेत. सुरुवातीला या मालिकेला वादाचे ग्रहण लागले होते.
या मालिकेतून भूत-प्रेत आत्म्यांसारख्या अंधश्रध्दांना खतपाणी मिळते आणि यातून कोकणाची बदनामी होते म्हणून राजकीय आंदोलन झाली होती तसेच चिपळून पोलिस स्थानकात मालिके विरोधात तक्रारही दाखल झाली होती. आकेरी गावात या मालिकेचं चित्रीकरण सुरु असून चित्रीकरण स्थळाला रोज शेकडो लोक भेट देत आहेत.