लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पेंग्विनचे दर्शन घेण्यासाठी दररोज हजारो पर्यटक भायखळा येथील राणीबागेच्या प्रवेशद्वारावर गर्दी करत आहेत. मात्र राणीबागेची सफर करण्यासाठी मुंबईकरांना यापुढे थोडा खिसा खाली करावा लागणार आहे. गेली अनेक वर्षे दोन आणि पाच रुपये असलेले या प्राणिसंग्रहालयाचे प्रवेश शुल्क शंभर रुपये करण्यात येणार आहे. हा प्रस्ताव बाजार आणि उद्यान समितीच्या बैठकीत सोमवारी मंजूर करण्यात आला. तब्बल दोन दशकांनंतर ही दरवाढ होणार आहे.भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात आणलेल्या पेंग्विनचे दर्शन १७ मार्चपासून मुंबईकरांना होऊ लागले आहे. पहिल्याच आठवड्यात पेंग्विन पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांची प्रचंड गर्दी झाली. एकाच दिवसात ४० हजार पर्यटक आल्याने सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला. त्यामुळे राणीच्या बागेत प्रवेशासाठी शुल्क वाढीचा प्रस्ताव गटनेत्यांच्या बैठकीत मांडण्यात आला. सध्या राणीच्या बागेत मुलांसाठी दोन रुपये तर प्रौढांसाठी पाच रुपये आकारण्यात येतात. यामध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव पालिका निवडणुकीपूर्वी आणण्यात आला होता. बाजार व उद्यान समितीच्या बैठकीत सोमवारी प्रस्ताव कोणत्याही चर्चेविना मंजूर केला. यानंतर तो पुढील मंजुरीसाठी स्थायी समितीपुढे सादर होईल. महासभेचे शिक्कामोर्तब झाल्यानंतरच दरवाढ लागू होईल. अशी आहे दरवाढपेंग्विन दर्शनासाठी १२ वर्षांखालील मुलांना ५० रुपये तर प्रौढांना शंभर रुपये आकारण्याचे प्रस्तावित होते. हे दर १ एप्रिलपासून लागू होणार होते. मात्र गटनेत्यांच्या बैठकीत यामध्ये बदल करत सध्या मुलांसाठी असलेले दोन रुपये शुल्क २५ रुपये, प्रौढांसाठी प्रत्येकी पाचऐवजी शंभर रुपये तर आई-वडील व दोन मुले आल्यास मिळून शंभर रुपये तर तिसऱ्या मुलासाठी अधिक २५ रुपये असे दर आकारण्यात येणार आहेत. ज्येष्ठ नागरिक आणि पालिका शाळेतील मुलांना मात्र मोफत प्रवेश मिळणार आहे. राणीबागेत मॉर्निंग वॉकसाठीही मासिक शुल्क ३० ऐवजी दीडशे रुपये करण्यात आले आहे. एक ते दोन वर्षे वय असलेल्या या पेंग्विनचे वजन सुमारे एक ते अडीच किलो एवढे आहे़ या पक्ष्यांची पूर्ण वाढ झाल्यानंतर त्यांची उंची सुमारे ६५ ते ७० सेंमी इतकी होईल़ त्या वेळेस त्यांचे वजन चार ते सहा किलो इतके असू शकेल़ त्यांचे आयुर्मान २० ते २५ वर्षे असते़ स्थायी समिती आणि महापालिकेच्या महासभेत या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतरच ही दरवाढ होणार आहे.या दरवाढीविरोधात आॅनलाइन मोहिमेत गेल्या दहा दिवसांमध्ये ७३५ जणांनी विरोध दर्शविला आहे. सेव्ह राणीबाग बोटॅनिकल गार्डन फाउंडेशन यांनी २७ एप्रिलपासून ही मोहीम सुरू केली आहे.
पेंग्विन दर्शनासाठी मोजा १०० रुपये !
By admin | Published: May 09, 2017 2:41 AM