मुंबई : कांदा उत्पादकांना प्रति क्विंटल १०० रुपये इतके अनुदान देण्याचा निर्णय राज्यमंत्री परिषदेच्या बैठकीत आज घेण्यात आला. जुलै आणि आॅगस्टमध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांद्याची विक्री केलेल्या शेतकऱ्यांना हे अनुदान देण्यात येणार आहे. एका शेतकऱ्यास जास्तीत जास्त २०० क्विंटलपर्यंत अनुदान मिळेल. मुंबई बाजार समिती वगळता राज्यातील इतर सर्व बाजार समित्यांसाठी हे अनुदान लागू राहील. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी या योजनेच्या अनुदानासाठी कांदा विक्रीपट्टी, सातबाराचा उतारा, बँक बचत खाते क्र मांक आदी तपशिलासह संबंधित बाजार समितीकडे अर्ज करणे आवश्यक आहे.परराज्यातील आवक झालेल्या व व्यापाऱ्यांच्या कांद्याला ही योजना लागू नाही. २०१५-१६ या वर्षात राज्यात ७४.२८ लक्ष मेट्रिक टन कांद्याचे उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षी हेच उत्पादन ५८.८९ लक्ष मेट्रिक टन इतके होते. शासन क्विंटलमागे १०० रुपये अनुदान देणार असल्याचे आणि त्याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत होणार असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने गेल्याच आठवड्यात दिले होते. (विशेष प्रतिनिधी)
कांदा उत्पादकांना क्विंटलमागे १०० रुपये
By admin | Published: August 31, 2016 5:58 AM