चेतन ननावरे/ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 - मुंबई विद्यापीठाच्या १६०व्या वर्धापन दिनानिमित्त एक हजार कोटी रुपये उभे करण्याची घोषणा मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी केली आहे. या पैशांतून विद्यार्थ्यांसाठी १ हजार ५०० विद्यार्थी क्षमतेचे वसतीगृह, शिक्षकांसाठी २५० घरे अशा विविध योजना राबवणार असल्याचेही देशमुख यांनी ह्यलोकमतह्णला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले.देशमुख म्हणाले की, मुंबई विद्यापीठात केवळ राज्य आणि देशातूनच नव्हे, तर परदेशातील विद्यार्थिही शिक्षणासाठी येतात. मात्र त्यांच्यासाठी आवश्यक वसतीगृह विद्यापीठाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना इच्छा असतानाही विद्यापीठात प्रवेश निश्चित करता येत नाही. मुंबईसारख्या ठिकाणी भाड्याने जागा घेऊन राहणे, विद्यार्थ्यांसाठी कठीण असते. त्यामुळे त्यांची ही अडचण दूर करण्यासाठी सुमारे १ हजार ५०० विद्यार्थी क्षमतेचे वसतीगृह उभारण्याचा मानस आहे. त्यामुळे चांगले विद्यार्थिही विद्यापीठाकडे आकर्षित होतील. आणि विद्यापीठातील विद्यार्थ्यांची संख्याही वाढेल. दर्जेदार शिक्षकांची वाढ व्हावी, म्हणून विद्यापीठातर्फे शिक्षकांसाठी घरांची व्यवस्था करण्याची घोषणाही देशमुख यांनी यावेळी केली. ते म्हणाले की, सुमारे २५० शिक्षकांसाठी घरे उभारण्याचा विद्यापीठाचा मानस आहे.याशिवाय विद्यापीठाचे स्वत:चे मालकीचे अतिथीगृह तयार करण्याची संकल्पनाही तयार आहे. किमान ५० अतिथींना त्यात राहण्याची व्यवस्था केली जाईल. याबाबत सविस्तर माहिती लवकरच समोर येईल. दरम्यान, विज्ञान भवनाची अष्टभुजा असलेली एक वास्तू तयार करण्याचे स्वप्नही कुलगुरूंनी व्यक्त केले. या वास्तूत सर्व शाखांची चर्चा करता येईल, असेही त्यांनी सांगितले. सोबतच विद्यापीठाच्या मालकीचे एक संग्रहालय तयार करून गेल्या १६० वर्षांतील अमूल्य दस्ताऐवज आणि ठेवा जतन करण्याचा विचार प्रत्यक्षात साकारणार असल्याचेही त्यांनी सांगितले................................विद्यापीठाच्या नावाला लौकीक अशा वास्तू उभारल्यास नक्कीच दर्जेदार विद्यार्थी आणि शिक्षक विद्यापीठाकडे आकर्षित होतील, अशी खात्री कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी दिली. या वास्तूंसाठी आवश्यक सर्व पैसा उभा करण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. विद्यापीठाकडे इतकी मोठी रक्कम उभी करण्याची क्षमता असून, विद्यापीठ मालकीची कोणतीही जमीन न विकता या गोष्टी निर्माण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.