मनोहर कुंभेजकर ।मुंबई : बकाल वर्सोवा बंदर स्वच्छ करण्यासाठी, २ आॅक्टोबर २०१५ साली वर्सोवा रेसिडन्ट आॅर्गनायझेशन (व्हीआरव्ही) आणि वेसावा कोळी जमात ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेल्या स्वच्छता मोहिमेला शनिवारी १०० आठवडे पूर्ण झाले आहेत. संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण प्रमुखांनी वर्सोवा बंदरचा ३ किमीचा परिसर स्वच्छ करणा-या या मोहिमेचा गौरव, जगातील सर्वात मोठी किनारा स्वच्छता मोहीम म्हणून महात्मा गांधी जयंती दिवशी केला होता.सुमारे दोन वर्षांपासून दर शनिवारी आणि रविवारी सकाळी ९ ते ११ या वेळेत ही मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती, अॅड. आफरोज शाह यांनी दिली. शाह यांनी सांगितले की, गेल्या ९९ आठवड्यांत सुमारे ७ कोटी ३० लाख किलो कचरा येथून गोळा करण्यात आला आहे. शनिवारी १००वा आठवड्यानिमित्त या ठिकाणी स्वच्छता सोहळा पार पडला. त्यात सुमारे २ लाख ५० हजार किलो कचरा गोळा करण्याचे काम सुमारे २ हजार स्वयंसेवकांनी केले. स्वच्छता मोहीम राबविल्यानंतरही समुद्राच्या पोटातील कचरा किना-यावर जमा होतो. त्यात प्लॅस्टिकच्या विशेष करून, दुधाच्या पिशव्या आढळून येतात. या पिशव्या कोळी बांधवांच्या जाळ्यात सापडत असल्याची प्रतिक्रिया मच्छीमार नेते राजहंस टपके यांनी या वेळी दिली, तर राज्याचे मत्स्यव्यवसायमंत्री महादेव जानकर यांनी या मोहिमेचे कौतुक केले. जानकर यांच्यासह या मोहिमेत आमदार भारती लवेकर, नगरसेविका प्रतिमा खोपडे, रंजना पाटील, वेसावा नाखवा मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र काळे, अभिनेता रणदीप हुडा आदी सहभागी झाले होते.
वर्सोवा बीच सफाईचा शंभरावा आठवडा, बकाल वर्सोवा बंदर होणार स्वच्छ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 2:58 AM