ऑनलाइन लोकमतलातूर, दि. २९ : लातूर शहरातील अभूतपूर्व पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या मदतीने मिरजहून रेल्वेद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ १२ एप्रिलपासून या जलपरीची सेवा असून, आतापर्यंत १०१ फेऱ्या झाल्या असून, २३ कोटी ४५ लाख लिटर पाणी जलपरीने लातूरकरांना पुरविले आहे़
लातूर शहरात मागील चार महिन्यांपासून अभूतपूर्व पाणीटंचाई आहे़ अर्धा पावसाळा संपत आला तरी अद्याप जिल्ह्यातील पाण्याचे स्त्रोत कोरडे आहेत़ लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पातही पाण्याचा साठा झालेला नाही़ रेल्वे तसेच बेलकुंड, माकणी, डोंगरगाव येथून टँकरद्वारे पाणी आणून शहरात पुरवठा करण्यात आला़ मात्र सर्वाधिक मदद होत आहे ते रेल्वेच्या पाण्याची़ १२ एप्रिल रोजी जलपरीची पहिली फेरी झाली़ १० वॅगनद्वारे ५ लाख लिटर पाणी आणण्यात आले़ १२ ते १९ एप्रिलपर्यंत जलपरीच्या १० वॅगनच्या ९ फेऱ्या झाल्या़ २० एप्रिलपासून दररोज ५० वॅगनद्वारे २५ लाख लिटर पाणी आणले जात आहे़ ५० वॅगनच्या ९२ फेऱ्या झाल्या आहेत़ आतापर्यंत या जलपरीने २३ कोटी ४५ लाख लिटर पाणी आणले असून, या पाण्यावर लातूरकरांची तहान भागविली जात आहे़
गेल्या तीन दिवसांपासून लातूर शहर व जिल्ह्यात बऱ्यापैकी पाऊस पडत असला तरी जमिनी बाहेर पाणी आले नाही़ त्यामुळे प्रकल्प कोरडे आहेत़ मध्यम प्रकल्पासह लघू प्रकल्पांतही पाणीसाठा झालेला नाही़ आतापर्यंत ३४० मिमी पेक्षा अधिक पाऊस होवूनही पाणी जमिनी बाहेर आले नाही़ त्यामुळे जलपरीची सेवा आॅगस्टपर्यंत सुरू ठेवण्यास रेल्वे प्रशासनाने सहमती दिली आहे़ जलपरीचा आधार लातूरकरांना मिळाल्यामुळे पाणीटंचाईवर काही प्रमाणात मात करता आली़ जलपरीचे दररोज २५ लाख आणि स्थानिक स्त्रोतातील ४५ ते ५० लाख लिटर असे एकूण ७० ते ७५ लाख लिटर पाणी महानगरपालिकेच्या वतीने टँकरद्वारे वाटप करण्यात येत आहे़.
जुलै महिन्याच्या प्रारंभी तीन दिवस तांत्रिक अडचणीमुळे जलपरीची सेवा खंडित झाली होती़ त्यावेळी मनपा प्रशासन हतबल झाले होते़ तीन दिवसाच्या खंडानंतर जलपरीची सेवा सुरू झाल्यास मनपा प्रशासनाला दिलासा मिळाला़ आता पावसाळ्यातही जलपरीचाच आधार आहे़
मांजरा प्रकल्प क्षेत्रात २४५ मिमी पाऊस झाला असला तरी प्रकल्प कोरडा आहे़ प्रकल्पाच्या वरच्या बाजूला लोहटा व खडकी शिवारात मांजरा नदीपात्रात काही प्रमाणात पाणी आले आहे़ मात्र त्या प्रवाह धरण पात्रात आलेला नाही़ धरण पात्रात थोडाही संचय नाही़ तीन दिवसांपासून पडत असलेला पाऊस प्रकल्प क्षेत्रात झाला तर पाण्याचा संचय होण्यास मदत होईल, असे मांजरा प्रकल्पाचे शाखा अभियंता अनिल मुळे यांनी सांगितले़