मुंबई : भाजपच्या केंद्रीय निवड समितीच्या बुधवारी रात्री झालेल्या बैठकीत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील १०५ उमेदवारांची नावे नक्की करण्यात आल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. २० ते २२ विद्यमान आमदारांचा पत्ता कापला जावू शकतो अशी माहिती आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिल्लीत ही बैठक झाली. राज्यात भाजप १५५ ते १६० जागा लढण्याची शक्यता आहे. महायुतीचा २८८ जागांचा फॉर्म्युला ठरलेला नाही.
शुक्रवारी पहिली यादी?- विद्यमान १०३ आमदारांपैकी सगळ्यांनाच पुन्हा संधी मिळण्याची शक्यता नाही. मुंबईसह प्रत्येक विभागात तीन ते चार आमदारांना संधी नाकारली जाऊ शकते. - गेल्या पाच वर्षांतील कामगिरी, भाजपच्या स्थानिक पदाधिकार्यांनी केलेले गुप्त मतदान, पक्षातर्फे करण्यात आलेली विविध सर्वेक्षणे व रा.स्व.संघाकडून आलेला फीडबॅक या आधारे काही आमदारांना डच्चू दिला जावू शकतो. - त्यात मुंबईतील चार ते पाच आमदारांचा समावेश असल्याची माहिती आहे. भाजपची ६० ते ७० उमेदवारांची पहिली यादी शुक्रवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.
तुल्यबळ उमेदवार असल्यास काय?चार ते पाच आमदार असे आहेत की जिथे महाविकास आघाडीत एकमत होणार नाही. या मतदारसंघांत ‘मविआ’त दोन तुल्यबळ उमेदवार आहेत. त्यापैकी एकाला संधी मिळेल. ज्याला संधी मिळणार नाही त्याला भाजपकडून उमेदवारी देण्याची रणनीतीदेखील आहे. त्यामुळे या मतदारसंघांत भाजपच्या उमेदवारीचा निर्णय शेवटच्या टप्प्यात होईल.