१०५ काँग्रेस, ९५ उद्धवसेना, ८४ शरद पवार गट... अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला!

By दीपक भातुसे | Published: October 23, 2024 05:35 AM2024-10-23T05:35:56+5:302024-10-23T05:37:30+5:30

तुटण्याच्या मार्गावरील आघाडी रुळांवर; रात्री उशिरापर्यंत चालले जागावाटप चर्चेचे गुऱ्हाळ; वादग्रस्त जागांवर ताेडगा; आज जाहीर होणार याद्या

105 Congress, 95 Uddhav Sena, 84 Sharad Pawar group Mahavikas Aghadi finally comes out with seat sharing formula for Maharashtra Assembly Election 2024 | १०५ काँग्रेस, ९५ उद्धवसेना, ८४ शरद पवार गट... अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला!

१०५ काँग्रेस, ९५ उद्धवसेना, ८४ शरद पवार गट... अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला!

दीपक भातुसे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: काँग्रेस आणि उद्धवसेनेतील वाद शमल्यानंतर मंगळवारी सुरू झालेल्या महाविकास आघाडीच्या चर्चेचे गुऱ्हाळ रात्री उशीरापर्यंत सुरू होते. रात्री उशीरा ठरल्यानुसार काँग्रेस आणि उद्धवसेनेतील जागा वाटपावर मार्ग काढण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेस सर्वाधिक १०५ च्या घरात जागा लढणार आहे, त्याखालोखाल उद्धवसेना ९५ च्या घरात आणि शरद पवार गट ८४ च्या घरात जागा लढवणार असून उरलेल्या जागा लहान मित्र पक्षांना सोडण्यात आल्याचे मविआतील सूत्रांनी सांगितले. दीर्घ काळ चाललेल्या या बेैठकीत मविआला पाठिंबा दिलेल्या लहान पक्षांच्या नेत्यांशीही चर्चा झाली.

- दोन दिवसांपूर्वी झालेली मविआची बैठक तब्बल ११ तास चालली होती. या बैठकीनंतरही विदर्भ आणि मुंबईतील १५ जागांवरील तिढा या तीन पक्षात कायम होता. विदर्भातील जागांवरून तर काँग्रेस आणि उद्धव सेनेतील वादामुळे आघाडी तुटण्याच्या मार्गावर होती. 
- मात्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी आणि उद्धव ठाकरे घेतलेली सामंजस्याची भूमिका आणि शरद पवार यांनी केलेल्या मध्यस्थीमुळे हा वाद शमला आणि थांबलेली मविआची चर्चा मंगळवारी पुन्हा सुरू झाली. त्यापूर्वी दिवसभरात विविध नेत्यांच्या भेटीगाठीतून तीनही पक्षातील समन्वय आणि संबंध चांगले राहतील याची खबरदारी मविआच्या नेत्यांनी घेतली. 
- त्यामुळे मंगळवारी सर्व जागा वाटपाची चर्चा संपवायची असा निश्चिय मविआच्या नेत्यांनी केला होता. त्यामुळे सर्व तोडगा काढण्यात पुन्हा मंगळवारी रात्री उशीरापर्यंत ही बैठक चालली आणि त्यातून तोडगा काढण्यात आल्याचे समजते.

लहान पक्षांचीही मनधरणी करण्यात यश

यात डावे पक्ष आणि इतर पक्षांच्या नेत्यांची मनधरणी करून त्यांना मविआसोबत येण्याची विनंती तीनही पक्षाच्या नेत्यांनी केल्याचे समजते. 
या बैठकीत कोणत्या पक्षाने किती व कोणत्या जागा लढवायच्या यावर शिक्कामोर्बत झाले. त्याबाबतची अधिकृत घोषणा बुधवारी केली जाणार आहे.

बारामतीत अजित पवार वि. युगेंद्र पवार

- शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांना बारामतीतून उमेदवारी निश्चित झाली असून पक्षाने मंगळवारी त्यांना एबी फॉर्म दिला आहे. युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत. 
- बारामतीतून अजित पवार विधानसभेला उभे राहिले तर इथे लोकसभेप्रमाणे पवार घराण्यात लढत बघायला मिळेल. बारामतीतील हा सामना काका (अजित पवार) विरुद्ध पुतण्या (युगेंद्र पवार) असा असेल.

Web Title: 105 Congress, 95 Uddhav Sena, 84 Sharad Pawar group Mahavikas Aghadi finally comes out with seat sharing formula for Maharashtra Assembly Election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.