मुंबई : दिवाळीनंतर म्हणजे १६ नोव्हेंबरपासून देशातील महाविद्यालये आणि शिक्षण संस्था प्रत्यक्ष सुरू करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) हिरवा कंदील दाखविल्यानंतर आता २३ नोव्हेंबरपासून राज्यातील शाळा सुरू करण्याचा विचार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्रीवर्षा गायकवाड यांनी दिली.राज्यात ‘पुनश्च हरिओम’नंतर वाहतुकीची साधने, प्रवास व्यवस्था, नाट्यगृहे, सिनेमागृहे, बाजारपेठा सुरू करण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर माध्यमिक शाळेतील नववी ते बारावीचे, यातही प्राधान्याने दहावी, बारावीचे वर्ग सुरू करण्याचा मानस असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले. सध्या शाळा बंद असल्या तरी शिक्षण ऑनलाइन सुरू आहे. राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊनच २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत. त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविल्या आहेत. राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहूनच मुख्यमंत्र्यांच्या अंतिम मंजुरीनंतर शाळा सुरू करण्यात येतील, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली. शालान्त माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या म्हणजे दहावी आणि बारावीच्या परीक्षा वेळापत्रकासंदर्भात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन परीक्षा मंडळातर्फे परीक्षा जाहीर करण्यात येतील. विद्यार्थ्यांच्या बरोबरच शिक्षकांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य ती काळजी घेऊन शाळा अध्ययन-अध्यापन प्रक्रिया आणि परीक्षा पार पाडण्यासाठी सरकार सक्षमपणे विचार करेल, असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून केंद्र आणि राज्य सरकारच्या सूचनांचे पालन करूनच शाळा सुरू करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासंदर्भात पालकांची परवानगी घेऊन आणि आरोग्यविषयक उपाययोजना करूनच शाळेतील कामकाज करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
दिवाळीची सुट्टी आता १४ दिवस मिळणार दिवाळीच्या सुट्टीत ५ दिवसांवरून वाढ करून शालेय शिक्षण विभागाने ती १४ दिवसांची केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणाला १४ दिवसांचा ब्रेक मिळेल. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या या निर्णयाचे शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांनी स्वागत केले.५ नोव्हेंबर २०२० च्या परिपत्रकानुसार १२ ते १६ नोव्हेंबर अशी सुट्टी देण्यात आली होती. मात्र, विद्यार्थी, शिक्षक, पालकांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर यात बदल करून शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आता ७ ते २० नोव्हेंबर अशी १४ दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे.