अविनाश साबापुरे, लोकमत न्यूज नेटवर्क, यवतमाळ: शिष्यवृत्ती वाटपात अतिरिक्त निधी वाटप केल्याचा ‘कॅग’चा अहवाल येताच शिष्यवृत्ती योजनांबाबत शासनाने कठोर पाऊल उचलले. विद्यार्थी व मुख्याध्यापकांचे बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन झाल्याशिवाय बँक खात्यात शिष्यवृत्ती रक्कम टाकलीच जाणार नाही. त्यामुळे सध्या सर्व जिल्ह्यात बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन शिबिरे होत आहेत. यात अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची प्रीमॅट्रिक शिष्यवृत्ती व बेगम हजरत महल शिष्यवृत्ती या योजनांमधील ११ लाख २५ हजारांवर विद्यार्थ्यांचे बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन करून घ्यावे लागेल.
४ ऑगस्टला राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात सादर झालेल्या कॅगच्या अहवालात २०१८-१९ ते २०२०-२१ या काळात हजारो अपात्र विद्यार्थ्यांना कोट्यवधीची शिष्यवृत्ती वाटप झाल्याचे पुढे आले. त्याची दखल घेत योजना शिक्षण संचालकांनीही राज्यात शिक्षणाधिकारी, पालिका अधिकारी यांना बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनबाबत लेखी निर्देश दिले. २०२२-२३ या सत्रात केंद्र सरकारच्या शिष्यवृत्ती पोर्टलद्वारे (एनएसपी) ज्या-ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झालेत, त्या प्रत्येक विद्यार्थ्याचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण करून घ्यावे लागणार आहे.
शिष्यवृत्ती : विद्यार्थ्यांचे अर्ज
- २०२१-२२ - १०,८६,१८३ धार्मिक अल्पसंख्याक प्रीमॅट्रिक
- २०२२-२३ - ११ लाख+ बायोमेट्रिक प्रमाणीकरण करण्याचे आव्हान शाळांपुढे राहणार आहे.
महाविद्यालयांनाही बंधनकारक
कॅगच्या अहवालानंतर ७ ऑगस्टला तंत्रशिक्षण संचालकांनीही राज्यातील सर्व पदविका, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांना तातडीने बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन करून घेण्याचे आदेश दिले. एनएसपी पोर्टलद्वारे राबविल्या जाणाऱ्या पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरलेल्या २०२२-२३ या सत्रातील विद्यार्थ्यांचे ऑथेंटिकेशन करून घ्यावे लागेल. बरेच विद्यार्थी यंदा अन्य कॉलेजात गेल्याने महाविद्यालयांना मोठी कसरत करावी लागेल.
आधी तपासणी मुख्याध्यापकांची...
पोर्टलच्या ‘वर्कफ्लो’नुसार मुख्याध्यापक व नोडल अधिकाऱ्याचे प्रमाणीकरण झाल्याशिवाय एकाही विद्यार्थ्यांच्या बायोमेट्रिक प्रमाणीकरणाची प्रक्रियाच पुढे जाणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांपूर्वी मुख्याध्यापक, नोडल अधिकाऱ्यांचेही बायोमेट्रिक प्रमाणित करून घ्यावे लागेल. सध्या मुख्याध्यापकांचे बायोमेट्रिक पूर्ण करण्यासाठी जिल्हा, तालुका स्तरावर विशेष शिबिरे सुरू आहेत.