- नम्रता फडणीस पुणे : पीपल्स लिग्वेस्टिक सर्व्हे ऑफ इंडियाने केलेल्या सर्वेक्षणानुसार आजमितीला भारतात जवळपास 780 भाषा बोलल्या जातात. मात्र, त्यातील अनेक भाषा लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे या भाषांचे जतन होणे आवश्यक आहे, ही कळकळ पुण्यातील एका चित्रपट दिग्दर्शकाला जाणवली आणि सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून मध्यप्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि गुजरात या राज्यातील 11 भाषांचे ’व्हिडिओग्राफीच्या’ माध्यमातून जतन करण्याचा पथदर्शक प्रकल्प त्यांनी राबविला. त्यांच्या भाषांचे दृकश्राव्य स्वरूपात जतन करण्याच्या पुढाकारामुळे चार राज्यात कोणत्या भाषा बोलल्या जात होत्या? याची माहिती नव्या पिढीला सहजपणे मिळू शकणार आहे. हा अभिनव प्रकल्प राबविणाऱ्या लेखक- दिग्दर्शकाचे नाव धनंजय भावलेकर आहे. ज्येष्ठ भाषा संशोधक डॉ. गणेश देवी यांच्या मार्गदर्शनातून हे काम त्यांनी हाती घेतले. भावलेकर आणि त्यांच्या टीमने मध्यप्रदेश मधील ’नहाल आणि सेहराई’, महाराष्ट्रातील ‘कोलामी’,‘निहाली’ आणि ’कोरकू’( यवतमाळ, अकोला आसपास भाग) , राजस्थानमधील ’धावरी’, ‘थाली’ आणि ‘धाटकी’ व गुजरातमधील ‘डुंगरभिल्ल’, ‘हलपती’ आणि ‘धाटकी’ अशा जवळपास 11 भाषांचे व्हिडिओ डॉक्यूमेंटेशन केले आहे. यासंदर्भात ‘लोकमत’शी बोलताना धनंजय भावलेकर म्हणाले, आज भारतात बोलल्या जाणाºया ७८० पैकी 400 भाषा लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत हे डॉ. देवी यांच्याशी चर्चा केल्यानंतर कळले. 1971 च्या जनगणनेत बाराशेच्या आसपास भाषा होत्या. ज्या आजमितीला 780 इतक्याच राहिल्या आहेत. याचा अर्थ निम्म्या भाषा मृतप्राय झाल्या. मात्र त्यांचे डॉक्यूमेंटेशन आपल्याकडे नाही. पीपल्स लिग्वेस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया अंतर्गत देशभरातील भाषांच्या सवर््हेक्षणावर प्रत्येक राज्याचा एक खंड निर्मित करण्यात आला आहे. प्रत्येक राज्यात किती भाषा आहे त्याचे विश्लेषण खंडामध्ये करण्यात आले आहे. महाराष्ट्राचा खंड पाहिला तर एकूण 60 भाषा बोलल्या जातात याची माहिती आम्हाला मिळाली. युनेस्को ने एक यादी जाहीर केली आहे ज्यात मृतप्राय होणा-या भाषा समाविष्ट केल्या आहेत. ते पाहून प्रत्येक राज्यात जाऊन भाषांचा सँपल सर्व्हे आणायचा का? असा विचार आम्ही केला आणि मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र या चारही राज्यात आमच्या टीमने जाऊन तेथील भाषेची स्थिती जाणून घ्यायचा प्रयत्न केला. या प्रकल्पासाठी भाषा सेंटर वडोदरा यांच्याकडून आम्हाला अर्थसहाय्य मिळाले. किती लोक ही भाषा बोलतात? भाषेला मान्यता आहे का? भाषेचा इतिहास, भाषेसाठी आंदोलन झाली आहेत का?असे प्रश्न लोकांना विचारण्यात आले. या चारही राज्यातील 11भाषांचे सौंदर्य आम्ही ‘डॉक्यूमेंट्ररी’च्या माध्यमातून जतन करू शकलो याचा आम्हाला आनंद आहे. 2021 मध्ये 780 पैकी किती भाषा राहातील असा प्रश्न आहे. या डॉक्यूमेंट्ररी मधून नव्या पिढीला या भाषा कशा बोलल्या जात होत्या, त्यांची संस्कृती, लोककला याची माहिती मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाने या 780 भाषांचे जतन करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा असेही ते म्हणाले. ...........चार राज्यातील भाषेसंदर्भात नोंदविलेली निरीक्षणे* महाराष्ट्रात ‘निहाली’ ही भाषा केवळ 2 हजार लोकच बोलतात. जी मध्यप्रदेशात ‘नहाल’ म्हणून ओळखली जाते. * भाषा मरण्याचे एकमेव कारण आहे प्रादेशिक भाषेतील असमतोल. नोकरीसाठी शहरात गेल्यानंतर तिथेच स्थायिक होणे, मुलं इंग्रजी शाळेत जाणे. मुख्य प्रवाहातील भाषेचा वापर होत असल्यामुळे मूळ भाषेशी संपर्क तुटणे या गोष्टी जाणवल्या.* गुजरात मध्ये काही गावांमध्ये अशी स्थिती होती की माणसेच नव्हती. केवळ एका माणसाला भेटण्यासाठी 25 ते 30 किलोमीटरचा प्रवास करावा लागला. समूहाने लोकं मिळाली नाहीत.* गुजरातमधीलच एका गावात ‘ब्रिटीश सिम्बॉल’ पाहायला मिळाला. हे सरकार आमचे किंग नाही. आम्ही ‘सरकार’ आहोत. जे सरकार चालवत आहेत ते आमचे सेवक आहेत. तुम्ही आमच्यासाठी काम करता अशी मानसिकता पाहायला मिळाली.
चार राज्यांमधील लुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या ११ भाषांचे‘व्हिडिओ डॉक्यूमेंटेशन’
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 6:00 AM
मध्यप्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि गुजरात या राज्यातील 11 भाषांचे ’व्हिडिओग्राफीच्या’ माध्यमातून जतन करण्याचा पथदर्शक प्रकल्प त्यांनी राबविला.
ठळक मुद्दे पुण्यातील चित्रपट दिग्दर्शकाचा पुढाकार आजमितीला भारतात जवळपास 780 भाषा