- रूपेश उत्तरवारयवतमाळ : तूर खरेदीसाठी बुधवारपर्यंतच मुदत असून तब्बल ११ लाख शेतकरी अजूनही प्रतीक्षा यादीत आहेत. त्यामुळे तूर खरेदीची मुदत वाढवावी, असा प्रस्ताव राज्याच्या सहकार विभागाने केंद्राकडे पाठविला आहे.शासकीय हमी दराच्या तुलनेत खुल्या बाजारात तुरीचे दर घटले आहेत. यामुळे हमी भावाने तूर विकता यावी म्हणून शेतकऱ्यांनी नाफेडच्या खरेदी केंद्राकडे तुरीची नोंदणी केली. राज्यभरातील नाफेडच्या केंद्रांवर आतापर्यंत १२ लाख शेतकºयांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी केवळ सव्वा लाख शेतकºयांनाच आतापर्यंत तूर विकता आली. परिणामी तब्बल ११ लाख शेतकरी प्रतीक्षेत आहेत.गत आठवड्यापासून राज्यातील केंद्रांवर तूर ठेवायला जागाच शिल्लक नव्हती. त्यामुळे अनेक शेतकºयांची तूर मोजलीच गेली नाही. आता नोंदणी झालेली तूर खरेदी करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. त्यामुळेच मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळाली, तरच तूर खरेदीचा गुंता सुटेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.नोंदणीनंतरही खरेदीबाबत संभ्रम१८ एप्रिलनंतर केंद्र शासनाने तूर खरेदीस नकार दिल्यास राज्य शासनाला उपाययोजना कराव्या लागतील. यापूर्वी २३ लाख क्विंटल तूर गोदामात पडून आहे. उर्वरित दोन दिवसांत शेतकºयांना नोंदणी करावी लागणार आहे. मात्र नोंदणीनंतरही त्यांची तूर खरेदी केली जाईल किंवा नाही, याबाबत संभ्रम कायम आहे.तूर खरेदीचा गुंता सोडविण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे वाढीव मुदतीचा प्रस्ताव पाठविला. या प्रस्तावाला मंजुरी मिळताच खरेदी सुरू होईल. मंजुरी न मिळाल्यास राज्य शासन उपाययोजना करेल.- सुभाष देशमुख, सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री
प्रतीक्षा यादीत ११ लाख शेतकरी ; मुदतवाढीसाठी केंद्राकडे प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 12:47 AM