श्रीरामपूर (अहमदनगर) : किरकोळ कारणातून श्रीरामपूरमध्ये रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास भडकलेल्या दंगलीनंतर सोमवारी शहरातील वातावरण निवळले. मात्र, भीतीमुळे व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली नाहीत.शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दंगलीप्रकरणी पोलिसांनी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रकाश चित्ते, युवा सेनेचे तालुकाप्रमुख अतुल वढणे, विश्व हिंदू परिषदेचे विजय जैस्वाल, भाजपाचे माजी शहराध्यक्ष मारुती बिंगले, संजय यादव यांच्यासह एकूण ४३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यातील ११ जणांना अटक करण्यात आली. १० आरोपींना १३ मे पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली.दोन वाहनांच्या धडकेनंतर रविवारी रात्री दोन गट समोरासमोर येऊन त्यांनी दुकाने, गाड्यांची जाळपोळ केली. रात्रीच पोलिसांनी दंगल नियंत्रणात आणली. जिल्हाधिकारी अनिल कवडे सकाळीच शहरात दाखल झाले. त्यांनी प्रांताधिकारी, तहसीलदारांसोबत दंगलग्रस्त भागाची पाहणी केली. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी व जिल्हाधिकाऱ्यांनी सायंकाळी शांतता समितीची बैठक घेऊन लोकांमध्ये विश्वास व सुसंवादाचे वातावरण निर्माण करण्याचे आवाहन केले. (प्रतिनिधी)
शिरपूरमध्ये १० वाहनांची नासधूसशिरपूर (धुळे) : मुलीची छेड काढल्याच्या कारणावरुन शिरपुरात रविवारी रात्री दोन गटात दंगल उसळली. दंगेखोरांनी पोलिसांच्या गाडीसह १० वाहनांची नासधूस करून दोन वाहने जाळली. दगडफेकीत तीन जण जखमी झाले आहे. पोलिसांनी ९ जणांना ताब्यात घेतले असून दंगलीचा गुन्हा नोंदविला आहे़ घटनास्थळी जिल्हा पोलिसांचे विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. मराठे गल्ली व वीर सावरकर चौकात दगडफेकीमुळे दगड व विटांचा मोठा खच पडला होता़