सोलापूर : दरोडेखोरांशी झुंज देत त्यांना पिटाळून लावणाऱ्या मेशक आणि यश जॉय पॉल या भावंडांना रोख ११ हजार रुपये देऊन मराठी मिशन शिक्षण संस्थेने त्यांचे कौतुक केले़ नातवंडांचा सन्मान होत असताना त्यांची आजी शकुंतला पॉल यांच्या पाणावलेल्या डोळ्यांमधून त्यांच्या भावना प्रकट झाल्या. ‘लोकमत’मध्ये पॉल भावंडांच्या शौर्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आणि मराठी मिशनच्या वोरोनोको प्राथमिक आणि माध्यमिक प्रशाला, रॉजर्स इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये या भावंडांवर कौतुकाचा वर्षाव सुरू होता. रोख ११ हजार रुपये देऊन मराठी मिशनने त्यांच्या शौर्याला प्रोत्साहित केले.शौर्य गाजवणाऱ्या पॉल भावंडांचा आदर्श इतरांनी घेण्यासारखा आहे. पॉल भावंडांना राष्ट्रपती शौर्य पदक मिळवून देण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत. संबंधितांना मराठी मिशनच्या वतीने निवेदन देण्यात येणार असल्याचे मुख्याध्यापिका सुनीता शेंडगे यांनी सांगितले.
दरोडेखोरांचा मुकाबला करणाऱ्या चिमुकल्यांना ११ हजारांचे बक्षीस
By admin | Published: July 12, 2015 2:30 AM