ऑनलाइन लोकमत
कल्याण, दि. २७ - रिमोट कंट्रोलने टीव्ही चॅनेल बदलण्याच्या मुद्यावरून बहिणीशा झालेल्या वादानंतर ११ वर्षीय मुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे. या मुलाच्या वडिलांनी तीन वर्षांपूर्वी राहत्या घरीच आत्महत्या केली होती, तेव्हापासूनच तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता, असे समजते.
मृत मुलगा एस.व्ही.एम. इंग्रजी शाळेचा विद्यार्थी असून कल्याण पूर्वेकडील शिवाजी नगर परिसरातील एका इमारतीत आई, चार बहिणी व एका लहान भावासह रहात होता. बुधवारी संध्याकाळी ४.३० च्या सुमारास टीव्ही पाहण्यावरून त्याचा मोठ्या बहिणीशी वाद झाला. त्यामुळे रागावलेला मुलगा दुस-या खोलीत निघून गेला आणि त्याने थेट पंख्याला गळफास लावून घेत आत्महत्या केली. थोड्या वेळाने त्याची दुसरी बहीण त्या खोलीत गेली असता, तिला आपला भाऊ पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला.
या घटनेमुळे त्याच्या कुटुंबियांना विशेषत: त्याच्या आईला मोठा धक्का बसला. तीन वर्षांपूर्वी त्यांच्या पतीच्या आत्महत्येनंतर त्या मुलांसाठी खंबीरपणे उभ्या राहिल्या व पतीचे किराणा मालाचे दुकान सांभाळू लागल्या. आर्थिक तंगी असतानाही त्यांनी अथक मेहनत करून सर्व मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवले होते. मात्र आपल्या मुलाच्या या कृत्यामुळे त्या पूर्णपणे खचूगेल्या आहेत. ' माझा मुलगा अभ्यासात अतिशय हुशार होताच, पण त्याने असे ( आत्महत्येचे) पाऊल का उचलले मला समजत नाही ! आपल्यालाही एक दिवस चांगल जीवन जगता येईल अशा माझ्या सर्व आशा आता धुळीत मिळाल्या आहेत' अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.