प्रदीप पाटील / नासीर कबीरकरमाळा/ भीमानगर : उजनी धरणाचे तळ्यात रूपांतर झाले असून, जून महिना संपत आला तरीही धरण परिक्षेत्रात अद्याप पाऊस पडला नाही. त्यामुळे या धरणाला वाळवंटाचे स्वरूप आले आहे. उजनीची अवस्था खूपच वाईट झाली असून, उजनीच्या पाण्याचे नियोजन व्यवस्थित न केल्यामुळे ११० टक्के भरलेल्या उजनी धरणाची अवस्था अशी झाली आहे.
पावसाळी अधिवेशनादरम्यान पुणे व सोलापूर जिल्ह्यातील आमदारांनी याविषयी तक्रारींचा सूर उठवला. अधिकारी वर्गावर नाराजी व्यक्त केली. पाणी नियोजन न केल्यामुळे आज उजनीची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. उजनीच्या इतिहासात कधी नव्हे ते मायनस ५८.६१ टक्क्यांपर्यंत धरण गेले आहे. बोगदा व कालवाकाठची पिके अखेरच्या घटका मोजत आहेत. गावागावांमध्ये पाणी आणि चाºयावाचून शेतकºयांवर जनावरे विकण्याची वेळ आली आहे. उजनी धरण काठच्या शेतकºयांचे हाल तर न विचारलेलेच बरे ! आज पाऊस पडेल.. उद्या पाऊस पडेल़़़ या भोळ्या आशेवर विसंबून राहिलेला शेतकरी पाईप लांबवून व विद्युत मोटारी वाढवून जीव मेटाकुटीला आला आहे.
धरणाची आजची स्थिती- उजनीची एकूण पाणीपातळी आजघडीला ४५८.१३० मीटरवर खालावली आहे. एकूण पाणीसाठा ९१३.६२ दलघमी, उपयुक्त पाणीसाठा वजा ८८९.१९ दलघमी, तर टक्केवारी वजा ५८.६१ टक्क्यांवर पोहचली आहे. एकूण टीएमसी पाणीसाठा ३२.२६, उपयुक्त टीएमसी वजा ३१.४० पर्यंत गेला आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी उजनीची पाणी क्षमता वजा १९.८८ टक्के होती.
- सोलापूरला पाणीपुरवठा करणाºया पाईपलाईन तसेच तिबार पंपिंगद्वारे पाणीपुरवठा केला जातोय. पाईपलाईन अस्तित्वात आल्यापासून गेल्या पंचवीस वर्षांत पहिल्यांदाच तिबार पंपिंगद्वारे पाणीपुरवठा करण्याची पाळी आली आहे. येणाºया काळात तरी उजनीवर नियंत्रण ठेवायचे असेल तर त्यासाठी उजनी धरण पाणी नियंत्रण समिती नेमावी व तज्ज्ञ शेतक ºयांचा समावेश करावा जेणेकरून पाण्यावर व अधिकाºयांवर नियंत्रण आणता येऊ शकेल, अशी मागणी आता होऊ लागली आहे.
उजनीचे पाणलोट क्षेत्र उघडे पडल्याने शेतकºयांचे हालकरमाळा : उजनी धरणातील पाणीपातळी कमालीची घटल्याने करमाळा तालुक्यातील पाणलोट क्षेत्र उघडे पडले आहे. पुनर्वसित शेतकरी उभी पिके वाचविण्यासाठी लाखो रुपये खर्चून धरणाच्या पोटात चाºया घेऊन पाण्यासाठी धडपड करीत आहेत.करमाळा तालुक्यात ऊस, केळी, भाजीपाला, फळबागांचे क्षेत्र या पुनर्वसित भागात असून धरणातील पाणीपातळी यंदा कमालीची घटल्याने पुनर्वसित शेतकºयांना उभी पिके वाचविण्यासाठी शेतकºयांनी एकत्रित येऊन लाखो रुपये गोळा करून नदीपात्रात जेसीबी, पोकलेनद्वारा दीडशे ते दोनशे फुटांपर्यंत खोल चाºया खोदून पाणी घेण्याचा प्रयत्न केला आहे. वरचेवर पाणी कमी होत असल्याने शेतकºयांना पुन्हा चाºया खोदाव्या लागत आहेत. केबल, विद्युत मोटारी वारंवार हलवून मोठ्या मेहनतीने कसरत करीत दुबार, तिबार पंपिंंग करून शेतीत असलेल्या उभ्या पिकांना वाचविण्यासाठी पाणी द्यावे लागत आहे. तालुक्यातील पश्चिम भागात केत्तूर, वाश्ािंबे, पोमलवाडी, कात्रज, खातगाव, टाकळी, कोंढारचिंचोली, सोगाव, कंदर, वांगी, बिटरगाव, सांगवी, ढोकरी, दहिगाव, उम्रड, मांजरगाव, कुगाव, चिखलठाण, हिंगणी, उंदरगाव या भागातील शेतकरी रात्रंदिवस उजनी बॅकवॉटर भागात फिरून उभ्या पिकांना वाचविण्यासाठी धडपड करीत आहेत.
कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक शेतीत करून पदरात काहीच पडत नाही. धरणातील पाण्याचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी चिखलठाणचे रहिवासी व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड यांनी केली आहे.