मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या चार किलोमीटर परिघात ११२ इमारती उंचीच्या मर्यादेचे उल्लंघन करून बांधण्यात आल्या आहेत, अशी माहिती नागरी हवाई वाहतूक संचलनालयाने (डीजीसीए) दिल्यानंतर उच्च न्यायालयाने या इमारतींवर तीन महिन्यात कारवाई करण्याचे आदेश डीजीसीएला दिले. तर चार कि.मीच्या परिघात ५६ मीटर उंचीच्या मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या बांधकामावर तसेच अँटेना, खांब इत्यादींवरही कारवाई करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने महापालिकेला दिला. त्यामुळे मोबाईल टॉवर्सवरही गदा येऊ शकते.बुधवारच्या सुनावणीत उच्च न्यायालयाने विमातळ परिसरात असलेल्या इमारतींची उंची किती असणे आवश्यक आहे, असा प्रश्न डीजीसीएला केला होता. त्यावर उत्तर देत गुरुवारच्या सुनावणीत डीजीसीएच्यावतीने ज्येष्ठ वकील राजीव चव्हाण यांनी विमानतळाच्या चार कि.मी परिघामध्ये ५६ मीटरचे उंचीचे बांधकाम करण्यास परवानगी आहे. मात्र ११२ इमारतींनी या नियमांचे उल्लंघन केले आहे, अशी माहिती न्या. व्ही. एम. कानडे व न्या. स्वप्ना जोशी यांच्या खंडपीठाला दिली. त्यावर खंडपीठाने ११२ इमारतींवर तीन आठवड्यांत कारवाई करण्याचा आदेश डीजीसीआयला दिला. तर ५६ कि. मी उंचीपेक्षा अधिक उंची असलेली बांधकामे, अँटीना, खांब याच्यावरही कारवाई करावी, असा आदेश उच्च न्यायालयाने डीजीसीआयला दिला. तर महापालिकेला सांताक्रुझ येथील सुनिता को- आॅप. हौसिंग सोसायटीचे बेकायदा मजले तोडण्याचेही आदेश दिले. त्याशिवाय विमानतळाजवळील बांधकामांची उंची समुद्र सपाटीपासून असलेली उंची मोजावी, असे निर्देश महापालिकेला देत या याचिकेवरील सुनावणी चार आठवड्यांनी ठेवली आहे. (प्रतिनिधी)
११२ बेकायदा बांधकामांवर टांगती तलवार
By admin | Published: September 02, 2016 1:46 AM