अमरावती : २१ फेब्रुवारीला होऊ घाललेल्या सार्वत्रिक निवडणुकीत तब्बल ११५ उमेदवार हे गुन्हेगारी पार्श्वभुमिचे असून त्यांच्यावर विविध गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. पोलीस रेकार्डवर ही नोंद करण्यात आली असून पोलीस विभागामार्फत या सर्व उमेदवारांकडून बंधपत्र लिहून घेतले जाणार आहे.
महापालिका, जिल्हा परीषद व पंचायत समिती निवडणुकांची उमेदवारांकडून जय्यत तयारी सुरु आहे. या निवडणुकीत गुन्हेगार प्रवृत्तीचे अनेक उमेदवार उभे आहेत. यात काहींवर गंभीर तर काहींविरुध्द किरकोळ गुन्हे दाखल आहे. महापालिका निवडणुकीत यंदा ६२६ उमेदवार रिंगणात असून त्यापैकी ११५ उमेदवार पोलीस रेकार्डवर आहेत. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी अशा उमेदवारांची यादी तयार केली आहे. निवडणुकीत शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे बंधपत्र लिहून घेतले जात आहे. ८५ टक्के उमेदवारांकडून बंधपत्र लिहून घेतल्या गेले आहे. १५ टक्के उमेदवारांकडूनही बंधपत्र लिहून घेतले जाणार आहे.
या उमेदवारांवर होणार प्रतिबंधात्मक कारवाईज्या उमेदवारांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहेत, असे गुन्हेगार पोेलीस आयुक्तांच्या हिटलिस्टवर आहे. त्यामध्ये उपमहापौर शेख जफर शेख जब्बार, विलास इंगोले, प्रदीप बाजड, सुरेश स्वर्गे, भारत चौधरी, अंबादास जावरे, प्रदीप दंदे, अशोक रेवस्कर, मनीष बजाज, दिनेश बुब, हरीदास शिरसाट, मडावी, आशिष गावंडे, अजय गोंडाणे, मंगेश मनोहरे, अरुण जयस्वाल, जितू ठाकुर, प्रवीण हरमकर, संतोष बंद्रे, अब्दुल वसीम, अफजल चौधरी, किरण अंबाडकर, ललीत झंजाळ, योगेश कावरे, चंदु बोंबरे यांच्यासह काही अन्य उमेदवारांचा सहभाग आहे. या उमेदवारांकडून बंधपत्र लिहून घेतले जाणार असून त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई केली जाणार आहे. गंभीर गुन्ह्यांची नोंद असणाऱ्यांची सीपीसमोर पेशी होणार४हत्या, प्राणघातक हल्ले, शस्त्र बाळगणे, शांतता भंग करणे आदी प्रकारच्या गुन्ह्यात आरोपी असणाऱ्या उमेदवारांची पेशी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या समोर केली जाणार आहे. पोलीस आयुक्त या गुन्हेगार प्रवृत्तींच्या उमेदवारांना निवडणुकीत शांतता व सुव्यवस्था ठेवण्यासंदर्भात ताकीद देणार आहे. समर्थकांचीही यादी तयार होणार४विविध गुन्ह्यात आरोपी असणाऱ्या या उमेदवारांच्या काही समर्थकांवरही गुन्हे दाखल आहेत. ते सुध्दा उमेदवारांसोबतच गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहेत. या समर्थकांची यादी तयार करण्याचे काम सुध्दा पोलीस विभागाने हाती घेतले असून त्यांच्यावरही पोलीस वॉच ठेऊन आहेत.गुन्हेगारी पाश्वभूमिच्या ११५ उमेदवार निवडणुकीत उभे असून या सर्वांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात येईल. ज्या उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल आहे. त्यांना शांतता व सुव्यवस्था ठेवण्यासाठी ताकीद दिल्या जाईल. - दत्तात्रय मंडलिक, पोलीस आयुक्त.